तीन-चार दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला मोठा धक्का बसला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांनी थेट ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. सचिन अहिर यांनी प्रवेश करताच ते बिनविरोध विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवडून आले. आता सचिन अहिर यांच्य़ा लेकीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने वडिलांनी पक्ष सोडला म्हणून टीका आणि तिरस्कार केला जात आहे यावर वक्तव्य केले आहे.
मुलगी काय म्हणाली?
किरण अहिर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी, माझ्या वडिलांनी पक्ष सोडला म्हणून टीका आणि तिरस्कार केला जात आहे. 2019 ला आदित्य ठाकरेंसाठी पक्ष सोडला आणि निष्ठेने पक्षात काम केलं त्याचं फळ आता मिळालं. माझ्या वडिलांबद्दल गेल्या काही दिवसापासून आरोप केले जात आहेत. माझ्या वडिलांना विचारलं जातंय की एवढी पद मिळाली तरी पक्ष का सोडला असे म्हटले.
पुढे किरण अहिर म्हणाल्या की, पक्षाने खूप काही दिलं याचा मी सन्मान करते. राजकारण म्हणजे राजकारण नाही तर जनसेवा करणे आहे. माझ्या वडिलांनी मेहनत निष्टेने काम केलं त्याचं फळ आता मिळालं आहे. माझ्या वडिलांनी 2019 ला आदित्य ठाकरे यांच्यासाठी पक्ष सोडला आणि त्यांना साथ दिली. सध्या सोशल मीडियावर किरण अहिर यांचा हा भावनिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सचिन अहिर कोण?
सचिन अहिर हे महाराष्ट्रातील अनुभवी आणि सक्रिय राजकीय नेते आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते आणि नंतर शिवसेना ठाकरे गटात सामील झाले होते. आता एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी आपल्या राजकीय भविष्याला नवी दिशा दिली आहे. उपसभापती पद मिळवून त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेत महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाली आहे. या विकासामुळे शिंदे गटाला विधान परिषदेत अधिक मजबूत उपस्थिती मिळाली आहे. तर ठाकरे गटाला एक अनुभवी आमदार गमावण्याचा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. अनेक नेते याला “लॉटरी लागल्यासारखी” घटना म्हणून पाहत आहेत.