Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासांत पावसाचा जोर चांगलाच वाढला असून जिल्ह्यात एकूण सरासरी 52.8 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 143.1 मिमी अतिवृष्टी झाली असून, त्याखालोखाल भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर वाढला असला तरी पंचगंगा नदीसह इतर नद्यांची पाणीपातळी सध्या इशारा पातळीच्या खाली असल्याने पूरधोका टळला आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 7 मार्ग वाहतुकीसाठी बाधित झाले असून 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
अलमट्टी धरण अजूनही तळाला
दरम्यान, अलमट्टी धरणात अजूनही तळात असल्याने पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर असला तरी दिलासा मिळाला आहे. अलमट्टी धरण भरण्यासाठी अजूनही 100 टीएमएसी पाण्याची गरज आहे. कोयना धरणातही आवक मोठ्या प्रमाणात धरणात विसर्ग होण्यासाठी अजून बराच अवधी आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्या तरी सध्या चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. शेतीसाठी पुरक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. सांगलीत सुद्धा गेल्या 24 तासांपासून कोसळधारा सुरू असून चांदोली धरण परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी
- गगनबावडा: 143.1 मिमी
- भुदरगड: 85.9 मिमी
- राधानगरी: 81 मिमी
- आजरा: 67.6 मिमी
- चंदगड: 65.3 मिमी
- कागल: 60.2 मिमी
- पन्हाळा: 58.3 मिमी
- शाहूवाडी: 46.9 मिमी
- गडहिंग्लज: 43.4 मिमी
- करवीर: 40.1 मिमी
- हातकणंगले: 20.9 मिमी
- शिरोळ: 16.8 मिमी
7 रस्ते बाधित; रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग सुरळीत
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील वाहतुकीवर अंशतः परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे 2 राज्यमार्ग, 2 प्रमुख जिल्हा मार्ग, 2 ग्रामीण मार्ग आणि 1 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 7 रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडून या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरक्षित असून रेल्वे सेवाही पूर्णपणे सुरळीत सुरू आहे.
31 बंधारे पाण्याखाली; नदीपातळी इशारा पातळीच्या खाली
जिल्ह्यातील एकूण 299 बंधाऱ्यांपैकी 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मात्र, प्रमुख नद्यांची पाणीपातळी अद्याप नियंत्रित आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाणीपातळी 28 फूट 3 इंच, शिरोळ बंधारा येथे 36 फूट, तर नृसिंहवाडी येथे 31 फूट इतकी आहे.
धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्ग
- राधानगरी धरण: 32% पाणीसाठा (सर्व स्वयंचलित दरवाजे सध्या बंद आहेत)
- तुळशी धरण: 38% पाणीसाठा
- वारणा धरण: 24% पाणीसाठा (100 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू)
- दूधगंगा धरण: 8% पाणीसाठा (100 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू)
जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन सतर्क
पावसाचा जोर असला तरी जिल्ह्यात आजअखेर कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्याची आवश्यकता भासलेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून, पूर प्रवण क्षेत्रावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर