Last Updated:
गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका कार चालकाने दुचाकीस्वारावर चाकूने जीवघेणा हल्ला केला.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका कार चालकाने दुचाकीस्वारावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या कार चालकाने दुचाकीस्वाराच्या पोटात चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केलं. हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे मनमाड शहरात खळबळ उडाली आहे.
२५ किलोमीटर थरारक पाठलाग
चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून कारसह सुसाट वेगाने फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी तत्काळ वायरलेसवरून संदेश देत आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तब्बल २४ किलोमीटरपर्यंत या कारचा थरारक पाठलाग केला.
पोलिसांनी येवला शहराजवळ नाकाबंदी करून आरोपीची कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहून आरोपीने थेट पोलिसांच्या अंगावरच कार घालण्याचा आणि त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि धाडसाने बाजूला होत कारची नाकेबंदी केली आणि अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या.
जखमी तरुण मालेगावच्या रुग्णालयात दाखल
या प्राणघातक हल्ल्यात इरफात बेग असं जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचं नाव आहे. त्याच्या पोटात चाकूने गंभीर वार झाल्यामुळे त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपी लक्ष्मीकांत शेजवळ पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी अटक केलेल्या या कार चालकाचे नाव लक्ष्मीकांत शेजवळ असे आहे. पोलिसांनी त्याची कार जप्त केली असून, त्याच्याविरोधात मनमाड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ वादातून अशा प्रकारे थेट चाकू हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Nashik,Maharashtra
