IRDAI Claim Approval Deadline: काही आजारांमध्ये रुग्णाला अवघ्या काही तासात अथवा एका दिवसात उपचारानंतर डिस्चार्ज मिळतो. TPA आणि विमा कंपन्यांकडून आतापर्यंतरुग्णालयातील उपचारांसाठी 24 तास राहण्याची अट होती. त्यामुळे अनेक जणांना आरोग्य विम्याचा फायदा होत नव्हता. आता हा अडथळा दूर करण्यात आला आहे. रुग्णांना उपचारासाठी केवळ दोन तास रुग्णालयात थांबूनही आरोग्य विमा मिळवता येणार आहे. कॅशलेस मेडिक्लेमचा दावा मिळवता येणार आहे. पण त्यासाठी महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. ही अट त्यांना पूर्ण केली तर कॅशलेस मेडिक्लेमचा फायदा मिळू शकतो.
IRDAI चे नवीन निर्देश
काळानुरुप विमा क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. विमा कंपन्यांसाठी आणि ग्राहकांसाठी अनेक सोयी-सुविधा येत आहेत. डिजिटलीकरण वाढले आहे. तर त्याचवेळी एकाच प्लॅटफॉर्मवरून सर्व प्रकारचे विमा ग्राहकांना खरेदी करणे सहज सोपे व्हावे असा ही प्रयत्न सुरू आहेत.
वैद्यकीय तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे. या क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे. मोतीबिंदू, डायलिसीस, केमोथेरपी आणि इतर अनेक उपचार एकाच दिवसात होत आहेत. काही ऑपरेशनही दोन ते तीन तासात पूर्ण होऊन संध्याकाळी रुग्णांना सुट्टी देण्यात येत आहे. अशावेळी 24 तास रुग्णालयात भरती राहण्याची अट शिथिल करण्याचे निर्देश विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) विमा कंपन्यांना दिला आहे. त्यासाठी विमा कंपन्यांना त्यांच्या पॉलिसीमध्ये अत्यावश्यक बदल करता येतील.
विमा संरक्षणाचा मिळेल फायदा
अर्थात प्रत्येक उपचारासाठी ही सुविधा मिळणार नाही. तुमच्या विमा कंपनीच्या धोरणानुसार आणि विमा करार नमूद केलेल्या उपचारासाठीच ही काही तास उपचारावर कॅशलेस मेडिक्लेम मिळेल. काही निवडक विमा कंपन्यांनी ही सोय सुरू केल्याचे समोर येत आहे. त्यासाठी विमा कंपनीशी संपर्क साधून तुम्हाला माहिती घेता येईल. एकाच दिवसात उपचार होऊन कॅशलेस मेडिक्लेम मिळत असल्याने अशा पॉलिसींची अधिक विक्री होण्याची शक्यता आहे.
उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास…
जर रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर IRDAI ने एक कडक नियम तयार केला आहे. अशावेळी रुग्णालयाचा जो काही खर्च असेल, तो तातडीने विमा कंपनीने देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे नातेवाईकांना अत्यंविधीची तयारी करता येईल. दुखाच्यावेळी त्यांना नाहक कागदी कारवाई आणि पैशांची जुळवाजुळव करताना जास्त अडचण येणार नाही.