पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण पुणे शहर हादरले असतानाच, आता केतनच्या लग्नाची तयारी करणाऱ्या थिंक हॉस्पीटॅलिटी (Think Hospitality) या नामांकित वेडिंग प्लॅनर संस्थेने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. केतनचे त्याच्या लग्नाबद्दलचे स्वप्न, त्याचा स्वभाव आणि अग्रवाल कुटुंबाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध सांगताना संस्थेने केतनच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला असून दोषींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
Ketan Agrawal Case : वेडिंग प्लॅनरने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या भावना
“ते केवळ क्लाइंट नव्हते, तर आमचे कुटुंब होते”
“अत्यंत जड अंतःकरणाने आणि अतीव दुःखाने आम्ही थिंक हॉस्पीटॅलिटी (Think Hospitality) परिवाराचे अत्यंत लाडके सदस्य केतन अग्रवाल यांच्या अकाली निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अग्रवाल कुटुंबासोबत आमचे नाते अनेक वर्ष जुने आहे. ते आमच्यासाठी केवळ व्यावसायिक क्लाइंट नव्हते, तर आमच्या कुटुंबाचाच एक भाग बनले होते. आम्हाला त्यांच्या दोन्ही मोठ्या भावांच्या लग्नाचे नियोजन आणि ते यशस्वीरित्या आयोजित करण्याचे भाग्य लाभले होते. आता आम्ही अत्यंत उत्साहाने उदयपूर येथे होणाऱ्या केतनच्या स्वप्नातील लग्नाची (Dream Wedding) जय्यत तयारी करत होतो.”

Ketan Agrawal Case : “भावी पत्नीवर त्याचे जीवापाड प्रेम होते”
केतनच्या स्वभावाविषयी सांगताना त्यांनी लिहिले, “या लग्नाच्या संपूर्ण नियोजनादरम्यान केतनसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत सुखद होता. तो अतिशय साधा, मनमिळाऊ, आनंदी आणि सर्वांसोबत मिळून मिसळून असलेला माणूस होता. लग्नाच्या प्रत्येक लहान-मोठ्या तयारीत तो स्वतः उत्साहाने सहभागी व्हायचा. त्याचे आपल्या होणाऱ्या पत्नीवर (सिया गोयल) जीवापाड प्रेम होते आणि तो आपल्या सुखी भविष्यासाठी अत्यंत उत्सुक होता.”
“असे प्रेम, आशा आणि आनंदाने भरलेले जीवन केवळ कोणाच्या तरी दुर्भावननेमुळे आणि हिंसेचा बळी ठरून अचानक संपून जावे, हे अत्यंत वेदनादायी, धक्कादायक आणि असहनीय आहे. एक संस्था म्हणून या कधीही भरून न निघणाऱ्या नुकसानीमुळे आम्ही स्तब्ध झालो आहोत. पण, त्याहूनही अधिक आमचे मन अग्रवाल कुटुंबासाठी व्याकुळ झाले आहे, जे सध्या या असहनीय दुःखातून जात आहेत,” अशा शब्दांत संस्थेने आपल्या भावना व्यक्त केल्या.
Ketan Agrawal Case : दोषींना कठोर शिक्षेची मागणी
या दुर्दैवी घटनेचा निषेध करताना पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “ज्या भयंकर घटनेने केतनचा जीव घेतला, आम्ही तिचा तीव्र शब्दांत निषेध करतो. एक निष्पाप, दयाळू आणि चांगल्या मनाचा माणूस आमच्यातून हिरावून घेतला गेला आहे. आम्ही या कठीण काळात अग्रवाल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत आणि या गुन्ह्यातील दोषींना लवकरात लवकर कठोर आणि निष्पक्ष शिक्षा व्हावी, अशी मागणी करतो. केतन, तुमचे हसणे, तुमचा स्नेह आणि तुमच्या आठवणी आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील. ॐ शांती.”
केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट त्यांची पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी मिळून रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. एका बाजूला केतन आपल्या भावी आयुष्याची आणि उदयपूरमधील भव्य लग्नाची स्वप्ने पाहत होता, तर दुसरीकडे त्याचा काटा काढण्याची तयारी सुरू होती, या क्रूर वास्तवावरच या वेडिंग प्लॅनरच्या पोस्टने भाष्य केलं आहे.