Nagpur Crime News : नागपूरातुन चक्क दीड कोटींची इलेक्ट्रिक बसच चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अमरावतीच्या राजापेठ पोलीसांनी बससह चोरट्याला पकडले आहे. चोरल्या गेलेल्या या ‘शिवाई’ बसची किंमत 1 कोटी 53 लाख रुपये इतकी आहे. चोरट्याने चौकशीदरम्यान दिलेली माहिती ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नागपुरातील इमामवाडा बसस्थानकातील चार्जिंग स्टेशनवरुन केली बसची चोरी
एका चोराने चक्क एसटी महामंडळाची बस चोरण्याचा विचार केला आणि तो अमलातही आणला. पोलिसांनी कारवाई करीत या चोरट्याला जेरबंद केले आहे. चोरल्या गेलेल्या या ‘शिवाई’ बसची किंमत 1 कोटी 53 लाख रुपये इतकी आहे. या चोराने चौकशीदरम्यान दिलेली माहिती ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. 1 जुलै रात्रीच्या वेळी नागपुरातील इमामवाडा बसस्थानकातील चार्जिंग स्टेशनवर एमएच 49/ बी. झेड. 8258 क्रमांकाची एक बस उभी होती. ही बस या चोरट्याने पळवली. दरम्यान, आज अमरावती शहरातील राजापेठ पोलीसांना ही बस राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केटजवळ उभी असल्याची माहिती मिळाली. बस चोरणारा चोरटा राजापेठ येथील गद्रे चौकात उभा असल्याचेही त्यांना कळले होते. राजापेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तत्काळ कारवाई करीत बस आणि चोरट्याला ताब्यात घेतले.
आरोपीने आतापर्यंत तेलंगणा, आंध्रप्रदेशातून तब्बल वीस बसेस चोरल्याचे समोर
चौकशीदरम्यान चोराने त्याचे नाव विष्णू गणपती नीलावर (वय 23 रा. हईत नगर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) असे सांगितले.1 जुलैला रात्री 1 वाजताच्या सुमारास इमामवाडा बसस्थानक येथून चार्जिंगला असलेली बस आपण चोरली हे, आरोपीने कबूल केले. पण, त्याने पुढे दिलेली माहिती ऐकून पोलिसही चक्रावून गेले. आरोपीने आतापर्यंत तेलंगणा, आंध्रप्रदेशातून तब्बल वीस बसेस चोरल्या असून त्याने नांदेड येथील बस स्थानकावरून देखील एक बस चोरली आहे. या प्रकरणी वजिराबाद, सीसीएस पोलीस स्टेशन तिरूमला आणि इतर पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे.
गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ झाल्याने बेळगावातील कुडची पोलीस सतर्क झाले होते. काही दिवसापूर्वी परमानंदवाडी येथून एक मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. कुडची पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवून चिंचली येथील मलगौडा अण्णासाहेब पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून एकोणीस दुचाकी वाहने चोरल्याचे कबूल केले चोरलेली वाहने त्याने वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केली होती . पोलीसांनी या चोरीच्या एकोणीस दुचाकी हस्तगत केल्या आहेत.