मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!


मुंबई : राज्यभरात पावसाने हाहाकार घातला असून मुंबईतही (Mumbai) पावसामुळे (Rain) दुर्घटना घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. तर, मुंबईतील पावसाच्या पहिल्याच दिवशी, गेल्या आठवड्यात महापालिकेचा (BMC) एक अधिकारीच मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा साकीनाका खैरनी रोड येथील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला.  त्याला वाचविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होते. मात्र, संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अस्लम शेख असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

मुंबईतील साकीनाका येथील मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा अखेर मृतदेहच हाती लागला आहे. साधारण 45 वर्षांचा व्यक्ती सकाळी 11 च्या सुमारास मॅनहोलमध्ये पडली होती. जवळपास दोन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.  

साकीनाका येथील खैराणी रोड, सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना एक व्यक्ती पडली. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे होते. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेली होती. यावेळी महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र, संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मॅनहोलमधून व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान, येथील मॅनहोलमध्ये पडलेला व्यक्ती साधारण 45 वर्षांचा असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून त्यास बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. महापालिका प्रशासन आणि संंबंधित अधिकाऱ्यांवर नेटीझन्सकडूनही रोष व्यक्त होत असून मुंबईच्या पावसात आणखी किती जणांचे जीव जाणार असा सवाल विचारला जात आहे. 

साकीनाका दुर्घटना, नेमकं काय घडलं? (Mumbai Sakinaka Manhole accident News)

मुंबईत तुफान पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं.यावेळी साकीनाका इथल्या खैरानी रोड परिसरात आज मॅनहोल दुरुस्तीचे काम सुरु होतं. दुरुस्तीच्या कामासाठी मॅनहोलचे झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं. यावेळी अन्सारी शेख त्याच रस्त्याने जात होते. ते फोनवर बोलत जात असताना त्यांनी खाली पाहिलंच नाही आणि थेट उघड्या मॅनहोलमध्ये पडले. हे मॅनहोल 20 ते 25 खोल आहे.

ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याचे बाजूला काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला समजले. त्यानंतर एकच धावाधाव सुरु झाली. उपस्थितांनी तात्काळ महानगरपालिका आणि रेस्क्यू टीमला कळवले. सदर घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. या व्यक्तीला सदर रस्त्यावरील पुढील मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. जेव्हा बाहेर काढले, तेव्हा सदर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत होती. थोड्यावेळाने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. (Andheri Manhole Incident)

महापौर म्हणाल्या, हे चुकीचं, चौकशी होणार

उबाठा शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं. प्रशासनाने मॅनहोलच्या घटनेची काळजी घ्यायला नको का, कालच एका चिमुकल्या मुलाचा झाड पडल्याने मृत्यू झाला. त्यानंतर, आज ही घटना घडल्याने प्रशासनाचा भोंगळपणा समोर आल्याचे श्रद्धा जाधव यांनी म्हटले. त्यावर, महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया देताना मी ते मान्य करते, असे म्हटले. तसेच, खुद्द येथील वॉर्ड ऑफिसरलाही या कामाबाबत माहिती नव्हती, हे धक्कादायक आहे. या कामासाठी कुठलीही वर्क ऑर्डर देण्यात आली नव्हती, समजा कुणी काम सुरू केलेलं असेल तरी तिथं बॅरिकेड्स लावायला पाहिजे होते. आम्ही एक्शन मोडवर असून कालच आम्ही चेंबूर घटनेप्रकरणी तीन जणांचे निलंबन केले आहे, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. तसेच, या कामाची देखील मी माहिती घेणार असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, जे झालं ते चुकीचं आहे, असेही महापौरांनी म्हटलं. 

अग्निशमन अधिकाऱ्याने दिली माहिती

साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटे मला आतमध्ये गेल्यानंतर त्या माणसाला बाहेर काढण्यासाठी लागले. मॅनहोलमध्ये उतरल्यानंतर आधी पाण्याचा प्रवाह बघितला. पाण्याचा प्रवाह बघून आतमध्ये गॅस असू शकतात आणि ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, त्यामुळे आधी व्हेंटिलेशन बघितलं. 25 फूट आतमध्ये जाऊन छोट्याशा जागेतून दुसऱ्या मॅनहोलपर्यंत पोहोचलो, तिथे हा व्यक्ती अस्वस्थ अवस्थेत होता. हर्निसच्या मदतीने त्या व्यक्तीला बाहेर आणलं, अशी माहिती महापालिका रेस्क्यू पथकातील अग्निशमन दलाचे अधिकारी ए.बी. सोनवणे यांनी दिली. 

अपघातस्थळी नेमकं काय सुरू होतं?

न्यू टेक इन्फ्रा कंपनीला पालिका एन विभागात दोन वर्षांपूर्वी मॅनहोलची झाकणे आणि जाळ्या बसवण्याचे कंत्राट मिळाले होते. त्याच्या देखभालीची जबाबदारी अजून काही दिवस या कंपनीवर होती.
साकीनाक्यात सर्व झाकणे आणि जाळ्या सुरक्षित आहेत का? याची पाहणी आज या कंपनीचे कर्मचारी करीत होते. मात्र, झाकण काढलेले असताना इथे बॅरिकेटिंग करणे आवश्यक होते, ते केले गेले नाही. त्यामुळे, या कामगारांच्या देखत अस्लम शेख खड्ड्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

घटनेचा अहवाल मागवला, चौकशी होणार

दरम्यान, साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेच्या घटनेचा संपूर्ण अहवाल मागवलेला आहे. या घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासून दोषींवर कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. पालिकेने वृक्षतोड आणि काही गोष्टींच्या कामाला उशिर केला आहे, असे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी संबंधित घटनेबाबत सांगितले.

माणूस गेला, जबाबदारी बेवारस – चित्रे

मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनीही या घटनेवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. एका निष्पाप नागरिकाचा जीव उघड्या मॅनहोलमुळे गेला. मागे उरली फक्त त्याची छत्री आणि चप्पल… पण प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा ठसा मात्र संपूर्ण शहरावर उमटला. ही केवळ दुर्घटना नाही, हा व्यवस्थेच्या बेफिकीरीचा बळी आहे. जे रस्ते, गटारे आणि नागरिकांची सुरक्षितता सांभाळू शकले नाहीत, त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? एका कुटुंबाने आपला माणूस गमावला. जबाबदारी मात्र अजूनही बेवारस आहे, अशा शब्दात अखिल चित्रे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

मॅनहोल का उघडले जातात?

जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, त्यावेळी रस्ते जलमय होतात पालिका प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम पंप आणि मॅनहोलच्या माध्यमातून केलं जातं. मॅनहोलमधून पाण्याचा निचरा वेगाने व्हावा सोबतच पाण्यातून आलेला कचरा अडकतो म्हणून मॅनहोलची जाळी काढली जाते. मात्र, तिथे असलेल्या पालिका अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त ही जाळी काढण्याची परवानगी कोणालाही नसते, असं केल्यास फौजदारी गुन्हा देखील पालिकेकडून दाखल केला जातो. मात्र, पालिकेकडून मॅनहोल उघडला जातो तेव्हा तिथे कर्मचारी तैनात असणे सक्तीचे आहे. जेव्हा मॅनहोल उघडला जातो तेव्हा SWM विभागाचा कर्मचारी मॅनहोलजवळ असणं अनिवार्य असतं. त्याठिकाणी मॅनहोल उघडा असल्याचा सूचना फलक देखील लावणं अनिवार्य असतं.

Sakinaka Manohole Accident VIDEO :

हेही वाचा

मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली, रिक्षा बुडाली, चालकाला बाहेर खेचले, PHOTO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *