Raksha Bandhan 2026: श्रावण महिना सुरू झाला की, विविध सणांची रेलचेलही सुरू होते. यात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण.. पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. बहिणी आपल्या भावांना सुखी आयुष्याच्या शुभेच्छा देत राखी बांधतात, तर भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. यावर्षी रक्षाबंधनाची तारीख आणि शुभ मुहूर्त काय आहे? रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा लागू असेल का? सर्व माहिती जाणून घ्या…
रक्षाबंधन 2026 : तारीख, शुभ मुहूर्त आणि भद्रा
वैदिक पंचांगानुसार, 2026 मध्ये श्रावण पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होईल आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 वाजता समाप्त होईल.
उदयतिथीच्या नियमानुसार, श्रावण पौर्णिमेची उदयतिथी शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026 रोजी असल्याने रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाईल. पौर्णिमा तिथी त्या दिवशी सकाळपर्यंतच असली, तरी उदयतिथीमुळे संपूर्ण दिवस रक्षाबंधनासाठी ग्राह्य मानला जातो.
रक्षाबंधन 2026 शुभ मुहूर्त
वैदिक पंचांगानुसार, यंदा राखी बांधण्यासाठी सुमारे 3 तास 51 मिनिटांचा शुभ कालावधी असेल.
- राखी बांधण्याचा मुख्य शुभ मुहूर्त: सकाळी 5:57 ते 9:48 पर्यंत
- लाभ-उन्नती मुहूर्त: सकाळी 7:33 ते 9:10
- अमृत-सर्वोत्तम मुहूर्त: सकाळी 9:10 ते 10:46
- चर (सामान्य) मुहूर्त: सकाळी 5:57 ते 7:33
यंदा रक्षाबंधनावर भद्राचा प्रभाव असेल का?
ज्योतिषींच्या मते, यंदा रक्षाबंधनाचा दिवस हा भद्रामुक्त असेल. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी भद्राकाळचा कोणताही अडथळा नाही.
मात्र, 27 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा तिथी सुरू होताच भद्रा लागू होईल.
भद्रा कालावधी: 27 ऑगस्ट सकाळी 9:08 ते रात्री 9:32
पाताळ भद्रा: सकाळी 9:08 ते दुपारी 1:35
पृथ्वी भद्रा: दुपारी 1:35 ते रात्री 9:32
धार्मिक मान्यतेनुसार, पृथ्वीवरील भद्रा असताना शुभ कार्य टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1:35 ते रात्री 9:32 या कालावधीत शुभ कार्य करणे टाळावे.
रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व
- रक्षाबंधनच्या धाग्याला शुभ, पवित्र आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
- या दिवशी राखी बांधल्याने नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
- अनेक ठिकाणी ब्राह्मण यजमानांना रक्षासूत्र बांधतात, तर मंदिरांमध्येही देवतांना राखी अर्पण करण्याची परंपरा आहे.
- श्रावण पौर्णिमेला स्नान, दान, जप आणि पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.
पौराणिक संदर्भ
- पौराणिक मान्यतेनुसार, श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या कथेनुसार, द्रौपदीने श्रीकृष्णाच्या जखमेवर वस्त्र बांधले होते. त्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन दिले.
- देवराज इंद्र आणि इंद्राणी यांच्या कथेत इंद्राणीने इंद्राच्या हातात रक्षासूत्र बांधले होते. त्यानंतर इंद्राला युद्धात विजय मिळाल्याची कथा पुराणांमध्ये सांगितली जाते.
- यम आणि यमुना यांच्या कथेनुसार, यमुनाने यमराजाला राखी बांधल्यानंतर यमराजाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले आणि जो भाऊ या दिवशी राखी बांधून बहिणीकडे जातो त्याला दीर्घायुष्य लाभते, असा आशीर्वाद दिला.
हेही वाचा :
Shravan 2026: श्रावण महिना..अध्यात्म – निसर्गाचा सुंदर संगम! कधीपासून सुरू होतोय? यंदा श्रावणी सोमवार किती? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!