पुणे: पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्या (Ketan Agrawal Case Pune) प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेही पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून ठोस उत्तरं देणं टाळत आहेत. आरोपी सतत माहिती लपवून ठेवत असल्याने, अखेर त्यांच्याकडून खरं वधवून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस (Ketan Agrawal Case Pune) आता ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ करण्याची तयारी करत आहेत.(Ketan Agrawal Case Pune)
Ketan Agrawal Case Pune: तांत्रिक भाषेत काय म्हणतात ‘लाय डिटेक्टर टेस्ट’?
गुन्हे अन्वेषण क्षेत्रात ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ला तांत्रिक भाषेत ‘पॉलिग्राफ टेस्ट’ (Polygraph Test) असे म्हटले जाते. या चाचणीदरम्यान संबंधित मशीन आरोपीच्या शरीरातील जैविक आणि शारीरिक प्रतिक्रियांमधील (उदा. रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छवास) बदलांची अचूक नोंद करते. या नोंदींवरून ती व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं खरी देत आहे की खोटे बोलून पोलिसांची दिशाभूल करत आहे, हे स्पष्ट होते. भारतात पॉलिग्राफ टेस्टचे निष्कर्ष थेट पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरले जात नसले, तरी पोलिसांना तपासाची योग्य दिशा मिळवण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते.
Ketan Agrawal Case Pune: आरोपींची पोलीस कोठडी उद्या संपणार; न्यायालयात होणार युक्तिवाद
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी उद्या, ३ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ११ वाजता या दोन्ही आरोपींना वडगाव न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयात सियाच्या वतीने ॲडव्होकेट विपुल दुशिंग, तर चेतनच्या वतीने ॲडव्होकेट राम शहाणे बाजू मांडणार आहेत. पुणे ग्रामीण पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाकडे करतील, तर दुसरीकडे आरोपींचे वकील त्यांना न्यायालयीन कोठडी (मॅजिस्ट्रेट कस्टडी) मिळावी यासाठी प्रयत्न करतील. याच वेळी पोलीस आरोपींच्या पॉलिग्राफ टेस्टसाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्याची दाट शक्यता आहे.
Ketan Agrawal Case Pune: मोबाईलमधील पुराव्यांशी छेडछाड? संशयाची सुई सियाकडे
पोलिस तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. केतन अग्रवालला दरीत खाली ढकलून दिल्यानंतर, त्यांचा मोबाईल फोन आरोपी सिया गोयल हिच्याकडे आला होता. काही काळ हा फोन स्वतःकडे ठेवल्यानंतर सियाने तो केतनच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. आता पोलीस या दिशेने तपास करत आहेत की, मोबाईल फोन सियाकडे असताना तिने त्यातील काही महत्त्वाचे पुरावे, मेसेज किंवा कॉल रेकॉर्ड्स डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का?
Ketan Agrawal Case Pune: कपडे, गाड्या आणि मोबाईल जप्त; घरातही पोलिसांची झाडाझडती
आज (गुरुवारी) पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक आरोपी सिया गोयल हिला सोबत घेऊन तिच्या घरी पोहोचले. तिथे पोलिसांकडून कसून तपासणी आणि झाडाझडती सुरू आहे. याशिवाय, पोलिसांनी आतापर्यंत तपासाचा भाग म्हणून सिया आणि चेतन यांचे कपडे, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली असून, त्यांची फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.