मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरणारा तिसरा नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) चित्रपट महोत्सव 7 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन होजे येथील ऐतिहासिक कॅलिफोर्निया थिएटरमध्ये पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात यंदा पाच मराठी चित्रपटांचे जागतिक प्रथम प्रदर्शन (World Premiere) होणार असून 11 पुरस्कारप्राप्त लघुपटांचे विशेष स्क्रीनिंगही आयोजित करण्यात आले आहे.
NAFAचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी ही माहिती दिली. जगभरातील मराठी प्रेक्षक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना एकत्र आणणारा हा महोत्सव मराठी सिनेमासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या पाच चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर
यंदाच्या महोत्सवात ‘तु मी आणि अमायरा’, ‘न आवडती गोष्ट’, ‘द्विधा’, ‘पारो’ आणि ‘फ्रेम’ या पाच मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर होणार आहेत. प्रेम, कुटुंब, स्त्री-अस्तित्व, सामाजिक वास्तव, नातेसंबंध आणि मानवी भावविश्व अशा विविध विषयांवर आधारित या चित्रपटांमधून मराठी सिनेमातील आशयवैविध्य आणि तांत्रिक गुणवत्ता अनुभवायला मिळणार आहे.
याशिवाय ‘ब्रह्मकमळ’, ‘बटरस्कॉच’, ‘एक सुवर्ण प्रवास’, ‘हायफन’, ‘अनडॉक्युमेंटेड’, ‘पान्हा’, ‘एच-1 बी ऑर नॉट टू बी’, ‘बबनराव इन लव्ह विथ एला’, ‘केकी’ यांसह एकूण 11 पुरस्कारप्राप्त लघुपटांचे स्क्रीनिंगही या महोत्सवात होणार आहे.
‘Undocumented.pdf’चा वर्ल्ड प्रीमिअर
‘Undocumented.pdf’ या लघुपटाची निर्मिती NAFAने केली असून अमेरिकेतील इमिग्रेशन या संवेदनशील विषयावर हा चित्रपट आधारित आहे. या लघुपटाचाही जागतिक प्रथम प्रयोग (World Premiere) याच महोत्सवात होणार आहे.
काय म्हणाले अभिजित घोलप?
NAFAचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, “यंदाचे वर्ष NAFAसाठी ऐतिहासिक आहे. महाराष्ट्र शासनाचे सहकार्य ही केवळ प्रशासकीय भागीदारी नसून मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रवासाला नवी ऊर्जा देणारी ताकद आहे. शासनाच्या पाठबळामुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक भक्कम व्यासपीठ मिळत आहे.”
ते पुढे म्हणाले, “यंदा भारत, अमेरिका आणि इतर देशांतून विक्रमी संख्येने चित्रपट प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यामुळे अंतिम निवड प्रक्रिया अत्यंत कठीण होती. चित्रपटांची निवड करताना मनोरंजनाबरोबरच त्यांचा आशय, दिग्दर्शन, पटकथा, अभिनय, संकलन, छायांकन आणि जागतिक प्रेक्षकांवर होणारा परिणाम या निकषांचा विचार करण्यात आला.”
अनुभवी परीक्षकांची निवड प्रक्रिया
चित्रपटांचे परीक्षण स्वप्ना वाघमारे-जोशी, आदित्य पटवर्धन, अनिकेत ढवळे, नितीन अडसूळ, डॉ. गौरी घोलप, भालचंद्र कुलकर्णी आणि दिलीप राणे या मान्यवर परीक्षकांनी केले. यंदा भारतातील सर्वोत्तम तीन लघुपट, अमेरिकेतील सर्वोत्तम तीन लघुपट, भारतातील सर्वोत्तम चित्रपट, आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम व्हर्टिकल मायक्रोड्रामा अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत.
मराठी सिनेमासाठी जागतिक व्यासपीठ
महाराष्ट्र शासनाचा भारताबाहेरील अधिकृत चित्रपट महोत्सव म्हणून मान्यता मिळालेला NAFA फिल्म फेस्टिव्हल हा केवळ चित्रपट प्रदर्शनापुरता मर्यादित नसून मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर पोहोचवणारा सांस्कृतिक दुवा ठरत आहे. नवोदित आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीची वाढती गुणवत्ता आणि जागतिक ओळख अधिक मजबूत करण्याचे काम हा महोत्सव करत आहे. यंदाच्या महोत्सवामुळे मराठी सिनेमाच्या जागतिक प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जा
णार असल्याचे मानले जात आहे.