4‍5 डिग्री तापमानात, आरोग्याची आणि त्वचेची कशी काळजी घ्यावी ? काय खावे आणि परिधान करावे जाणून घ्या – Marathi News | Know what to eat and wear for your health and skin in scorching temperatures of 45 degrees


महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच काही राज्यांमध्ये उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 45 डिग्रीच्या वर उष्णतेचा पारा जात आहे. या दिवसांत घराबाहेर पडणेही कठीण होणार आहे. तथापि कामामुळे अनेक लोकांना आपली घरे सोडावी लागतात. तज्ञांचा सल्ला आहे की, जर तुम्ही या कडक उन्हात बाहेर जात असाल, तर तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या भीषण उन्हाळ्यात तुम्ही काय खाता-पिता यापासून ते कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता यापर्यंत प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

कारण थोड्याशा निष्काळजीपणामुळे डिहायड्रेशन, उष्माघात, उष्णतेमुळे येणारे पुरळ आणि त्वचा काळवंडणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी शरीर आतून थंड आणि आर्द्र ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हलके आणि आरामदायक कपडे परिधान करणे आणि त्वचेची योग्य काळजी घेणे त्वचेला कोरडेपणा आणि उन्हामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकते. चला या वाढत्या उष्णतेच्या तापमानात आपण काय खावे, कोणते कपडे परिधान करावे आणि काय टाळावे हे जाणून घेऊयात.

रखरखत्या उन्हात आरोग्य चांगले राहण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा

कडक ऊन, उष्ण वारे आणि प्रचंड उष्णता ही दिवसेंदिवस वाढतच चालेली आहे.त्यामुळे या दिवसांत शरीर थंड ठेवणे आवश्यक आहे. आयुर्वेद तज्ञ सांगतात की या भीषण उन्हाळ्यात थंडावा देणारे आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ खावेत. जसे की आपल्या आहारात कच्ची काकडी, खरबूज, कलिंगड, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो यांचा समावेश करा. हे पदार्थ तुम्हाला उष्माघातापासून वाचवण्यास मदत करतील. याव्यतिरिक्त आपल्या आहारात मोसमी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. कलिंगड, खरबूज, दोडका, दुधी, कारले, पुदिना आणि कोथिंबीर हे चांगले पर्याय आहेत.

याव्यतिरिक्त शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी, केवळ पाणीच नव्हे तर नारळाचे पाणी, ताक, बडीशेपचे सरबत, बेलफळाचे सरबत आणि आंब्याच पन्हं यांसारखी घरी बनवलेली पौष्टिक पेये देखील प्या.

या गोष्टी टाळा

उष्णतेत डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो. त्यामुळे, चहा आणि कॉफी माफक प्रमाणात पिण्याचा प्रयत्न करा. तसेच, थंड पेये टाळा. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. याशिवाय, गरमीच्या या दिवसांत तेलकट, मसालेदार आणि बाहेरचे खाणे टाळा. यामुळे पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो.

योग्य कपडे निवडा

उन्हाचा तडाखा खूप तीव्र होत चालेला आहे. त्यामुळे शरीराला अधिक आरामाची गरज असते. हलके, सुती किंवा लिननचे कपडे परिधा करण्याचा प्रयत्न करा. हे कपडे घाम शोषून घेतात आणि आराम देतात. घट्ट किंवा जाड कपडे घालणे टाळा. बाहेर जाताना डोके आणि चेहरा झाकण्याचे लक्षात ठेवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *