स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचे आंदोलन, थेट महावितरणच्या मीटर केबिनलाच ठोकले टाळे – Marathi News | Citizens protest against smart meters in various locations; Mahavitaran office cabin locked.


स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण आणि ठाण्यानंतर आता डोंबिवलीतील रहिवाशांनीही महावितरणविरोधात अनोखे आंदोलन छेडले आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील काही सोसायट्यांनी थेट महावितरणच्या मीटर केबिनलाच कुलूप ठोकत स्मार्ट मीटरला विरोध दर्शवला आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलू नयेत,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा रहिवाशांनी लेखी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीला दिला आहे.

स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात डोंबिवलीतील नागरिक आता थेट मैदानात उतरले आहेत.डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील नवसंकुलसह काही सोसायट्यांमध्ये महावितरणच्या मीटर केबिनला कुलूप ठोकण्यात आले आहे.महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता काही भागांत स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे आपल्या सोसायटीत अशी कारवाई होऊ नये,यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मीटर बॉक्सला कुलूप लावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात रहिवाशांनी महावितरणला लेखी पत्र देत कोणतीही जबरदस्ती करू नये, आधी अधिकृत नोटीस द्यावी आणि त्यानंतरच सोसायटी स्तरावर निर्णय घेतला जाईल,अशी भूमिका स्पष्ट केली आहे.स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढण्याची भीती आणि इतर तांत्रिक समस्यांबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान,कुलूप लावलेल्या मीटर केबिनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून डोंबिवलीतही असंतोष उफाळून आल्याचे दिसत आहे. महावितरणने याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही डोंबिवलीकरांनी दिला आहे.

अंबरनाथमध्ये मनसेचे स्मार्ट मीटर आणि टीव्ही फोडत आंदोलन

मागील दोन दिवसांपासून नागरिकांना महावितरणकडून मेसेज पाठवले जात असून ४८ तासात स्मार्ट मीटर बसवलं जाणार असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत नागरिकांमध्ये असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के, बबलू खान, प्रकाश नलावडे आणि विशाल गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. गळ्यात स्मार्ट मीटर आणि वाढीव बिलांचे फोटो घालून मनसेनं महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर महावितरण कार्यालयाबाहेर स्मार्ट मीटर आणि टीव्ही फोडून आंदोलन केलं. यावेळी महावितरणच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांना विश्वासात न घेता मीटर बदलण्याचा प्रयत्न केल्यास मीटर बदलायला आलेले कर्मचारी मार खातील, असा थेट इशारा यावेळी मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप उपोषण

बदलापुरात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांचा रोष वाढत असून सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांनी उपोषण सुरू केले आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव वीजबिलांचा फटका बसत असल्याचा आरोप करत त्यांनी महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलन छेडले आहे.आंदोलकांच्या मते, नागरिकांचा विरोध असतानाही सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

वाढीव वीजबिल येत नाही – महावितरण

दरम्यान, महावितरणने हे आरोप फेटाळून लावत शासनाच्या धोरणानुसारच स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. स्मार्ट मीटरमुळे कोणतेही वाढीव वीजबिल येत नसून वीज वापराची अचूक नोंद होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविता येणार

धुळे शहरासह जिल्हाभरात महावितरणकडून गेल्या दोन-चार दिवसांत एसएमएस/व्हॉटस्अ‍ॅपद्वारे स्मार्ट मिटर बसविण्याबाबत 48 तासांची पूर्वसुचना देण्यात आलेली आहे. ही नोटीस आणि  प्रक्रिया ही पूर्णत: बेकायदेशीर, नियमबाह्य दिशाभुल करणारी असून यासंदर्भात सक्तीचा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. केंद्र शासनाच्या 17 ऑगस्ट 2021 च्या अधिसुचनेनुसार कोणत्याही ग्राहकावर सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा अधिकार महावितरणला नसून या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका डब्ल्युपी 5591/2223 मध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविता येणार नाही, अन्यथा ती बेकायदेशीर कारवाई समजण्यात येईल.

संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर

विद्युत कायदा 2003 च्या कलम 55 नुसार कार्यरत मीटर बदलणे बंधनकारक नाही. एमईआरसी विद्युत पुरवठा संहिता 2021 नुसार मीटर बदलासाठी 15 दिवसांची नोटीस देणे ग्राह्य असतांना 48 तासांची नोटीस ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. तसेच या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाही या संदर्भात देखील निवेदन दिले होते. ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असून ग्राहकांची संमती न घेता मीटर बदलविण्याचा अधिकार विद्युत वितरण कंपनीला नाही? स्मार्ट मीटरमुळे बिलांमध्ये वाढ झाल्यास जबाबदार कोण तांत्रिक बिघाड, जास्त बिल, रिडींगच्या चुका याबाबत विद्युत हमी घेणार का? हे प्रश्‍न सर्वसामान्य जनतेत निर्माण झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *