निर्मात्यांनी 1940 आणि 50 च्या दशकातील मुंबई, विंटेज गाड्या, आलिशान स्टुडिओ यांचं इतक्या बारकाईने चित्रण केलं आहे की त्यात तुम्ही पूर्णपणे रमून जाता. जर तुम्हाला मर्डर मिस्ट्री व्यतिरिक्त काहीतरी वेगळं आणि सस्पेन्सने भरलेली कथा पहायची असेल, तर तुमच्यासाठी ही सीरिज सर्वोत्तम पर्याय आहे.
या सीरिजची कथा भारताच्या स्वातंत्र्याच्या अवघा एक महिना आधी, मुंबईतील सर्वांत मोठा स्डुडिओ रॉय टॉकीजमध्ये सुरू होते. या स्टुडिओचा मालक त्याच्या नवीन चित्रपटासाठी एका अभिनेत्याच्या शोधात असतो, ज्याला तो पडद्यावर मदन कुमार म्हणून दाखवू इच्छितो. स्टुडिओ मालकाला तसा अभिनेता सापडतो, पण कथेत तेव्हाच वळण येतं.
तो अभिनेता स्टुडिओ मालकाच्या स्टार पत्नीच्या प्रेमात पडतो. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात आणि मुंबईतून पळून जाण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर स्टुडिओचा मालक त्याचा व्यवसाय आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी एक प्लॅन करतो. पडद्यामागील कारस्थान, ब्लॅकमेल आणि फसवणुकीचं एक असं जाळं विणलं जातं, ज्यातून कोणालाही सुटणं अशक्य वाटतं.
या सीरिजमध्ये कोणीही पूर्णपणे चांगलं किंवा वाईट नाही. प्रत्येत पात्र आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी इतरांना मागे सोडायला तयार आहे. सीरिजची कथा सहजपणे उलगडत जाते आणि प्रत्येक एपिसोडगणिक पुढे काय घडणार, याची उत्कंठा वाढत जाते. या सीरिजचा क्लायमॅक्ससुद्धा थक्क करणार आहे.
या वेब सीरिजचं नाव 'जुबिली' असं आहे. आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 8.3 अशी रेटिंग मिळाली आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही सीरिज पाहता येईल. यामध्ये मुप्रोसेनजीत चॅटर्जी, अपारशक्ती खुराना, सिद्धांत गुप्ता, अदिती राव हैदरी, वामिका गब्बी आणि राम कपूर यांनी भूमिका साकारल्या आहेत.




