Last Updated:
पार्थ पवार यांनी अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने अतिशय भावनिक ‘शब्दांजली’ वाहिली आहे.
मुंबई : दिवंगत नेते अजित दादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त राजकीय पक्षांच्या विविध नेत्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मात्र सकाळपासून कोणतीही पोस्ट केलेली नव्हती. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी पोस्ट करून आपल्या वडिलांना भावुकपणे आदरांजली वाहिली.
पार्थ पवार काय म्हणाले?
दादा… आज पूर्ण दिवस गेला, पण तुमच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द लिहिण्याचं धाडसच होत नव्हतं. दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुमच्याविषयी व्यक्त होणारं प्रेम आणि आदर पाहताना तुमच्या आठवणी सतत डोळ्यांसमोर येत राहिल्या. तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते आहे.
दादा, तुम्ही असताना प्रत्येक संघर्ष सोपा वाटायचा. आज प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते. पण तुम्ही काळजी करू नका. तुमच्यावर प्रेम करणारी महाराष्ट्रातील जनता, तुमच्या लाडक्या बहिणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाखो निष्ठावान कार्यकर्ते व सर्व आमदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
महाराष्ट्राची सेवा करताना तुमच्यासाठी प्रत्येक माणूस महत्त्वाचा होता. त्याच भावनेने आम्ही तुमचं कार्य पुढे नेत राहू. तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच कायम राहू देत. तुम्ही सदैव आमच्या हृदयात राहाल, असे पार्थ पवार यांनी म्हटले.
सुनेत्रा पवार यांची भावनिक आदरांजली
दादा, एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला… घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा.. पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ… आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील… माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम…!
Mumbai,Maharashtra
Jul 22, 2026 10:19 PM IST
