मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ


पुणे : जवळपास 81 तास मदत व बचावकार्य सुरू राहिलेल्या पिंपरी-चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनाप्रकरणी (Moshi accident) आता फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पिंपरी चिंचवडमधील कचरा डेपो परिसरात झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेत 9 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. दुर्घटनेनंतर तब्बल चार दिवसांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेतली. महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. 

इमारत दुर्घटनाप्रकरणी कंपनीने निष्काळजीपणा, सुरक्षेच्या दृष्टीने तडजोड केली होती का? इमारत उभारण्याच्या दृष्टीने परवानगी घेतली होती का? यासंदर्भात कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच, दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्या देखील प्रथमदर्शनी चुका दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. कुलकर्णी आणि आल्हाट यांच्या चुका असल्यानेचं त्यांचा सर्व कार्यभारही काढून घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशींनी दिली.

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या वरच्या दोन्ही मजल्याला पूर्णत्वाचा दाखला नव्हता, एबीपी माझाने दाखवलेल्या या बातमीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. एबीपी माझाने पर्दाफाश केल्यावर आयुक्तांना जाग आली असून दुसरीकडे राज्याच्या नगरविकास विभागाने विभागीय आयुक्त शीतल तेलींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय इमारत दुर्घटनेसाठी चौकशी समिती नेमली आहे.

मोशी इमारत दुर्घटनाप्रकरणी नगरविकास विभागाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली असून विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त वगळता सर्व त्रयस्थ विभागातील उच्च अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून एक महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल आणि दोन महिन्यांच्या आत अंतिम चौकशी अहवाल देण्याचे बजावण्यात आले आहे. या दुर्घटनेला पालिकेचा पर्यावरण विभाग आणि कचरा व्यवस्थापनाचे काम पाहणारी कंत्राटदार कंपनी ‘अँटोनी लारा रिन्युएबल’ (Antony Lara Renewable) हेच पूर्णपणे जबाबदार असल्याचं प्रसारमाध्यमांनी सातत्यानं समोर आणलं होते. त्यानंतर कंपनीला सुरुवातीला क्लीन चीट देण्याच्या भूमिकेत असलेल्या आयुक्तांनी आता कारवाई सुरू केल्याचं दिसून येत आहे. 

खासदार श्रीरंग बारणेंचाही इशारा

पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटना इमारतीत नऊ निष्पापांचा बळी गेला. आता या प्रकरणी पालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि ऍंथोनी लारा रिन्यूयेबल कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशींनी ते धाडस दाखवावं, अशी मागणी शिंदे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी केली होती. आयुक्तांनी जर दोशीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे आपण तक्रार करणार आहेत, असेही बारणेंनी म्हटले होते. 

हेही वाचा

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *