मोठी बातमी! सुनील तटकरेंनी अमित शहांनंतर घेतली PM मोदींची भेट, कारण आलं समोर – Marathi News | Sunil tatkare meets pm narendra modi after amit shah ncp merger nda speculation


राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना वेग आला असताना सुनील तटकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. याआधी काल तटकरेंनी गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. अशातच तटकरे भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

सुनील तटकरेंनी सोशल मीडियावर दिली माहिती

सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तटकरे यांनी ‘आज नवी दिल्ली येथे देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध विकासकामांच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली व त्यांचे मार्गदर्शन घेतले अशी माहिती दिली आहे. यावेळी तटकरे हे पंतप्रधान मोदींनी एक निवेदन देत असल्याचेही पहायला मिळत आहेत.

शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची घेतली होती भेट

यापूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट आणि दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते. मात्र, पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी स्पष्ट केले होते की, त्यांनी आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांसोबत NEET प्रश्नपत्रिका लीक प्रकरण, विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, जलव्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

शरद पवारांच्या पक्षातील नेते NDA सोबत जाण्यास तयार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सहभागी होऊ शकतात, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे बहुतांशी नेते हे NDA सोबत जाण्यास तयार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच काही नेते हे इंडिया आघाडीसोबत राहण्यास इच्छुक आहेत. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का आणि शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये सामील होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *