या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. दिल्ली ते गुजरात हा मोठा मार्ग यापूर्वीच पूर्ण झाला होता. मात्र काही भागांमध्ये जमीन संपादनाशी संबंधित अडचणी निर्माण झाल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या कामाला काहीसा विलंब झाला. सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेला हा एक्स्प्रेसवे आता पूर्णत्वाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
राजस्थानातील कोटा परिसरात उभारण्यात आलेला 4.9 किलोमीटर लांबीचा बोगदा हा या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
विशेष म्हणजे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मुकुंदरा हिल्स व्याघ्र प्रकल्पाखाली (Mukundra Hills Tiger Reserve) प्रथमच आठ पदरी (8-Lane) महामार्गाचा बोगदा बांधण्यात आला आहे.
हा बोगदा भारतीय पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. कारण जगात यापूर्वी इतक्या मोठ्या क्षमतेचा आठ पदरी रस्ता असलेला बोगदा उभारण्यात आलेला नाही. हा बोगदा 1,386 किलोमीटर लांबीच्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
संपूर्ण एक्स्प्रेसवे वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सध्या दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी 24 तासांहून अधिक वेळ लागतो. मात्र एक्स्प्रेसवे पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर हा प्रवास केवळ 12 तासांत पूर्ण करणे शक्य होईल.
यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्याबरोबरच इंधनाची बचत होणार असून वाहतूक व्यवस्थाही अधिक वेगवान होईल.
या एक्स्प्रेसवेमुळे देशातील लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.
दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी झाल्यामुळे वाहतूक खर्चातही मोठी घट होण्याची अपेक्षा आहे.
यामुळे उद्योग, व्यापार आणि निर्यात क्षेत्रालाही चालना मिळणार आहे.
कोट्यातील बोगद्याची रचना करताना पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणालाही विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
बोगदा जमिनीखाली बांधल्यामुळे मुकुंदरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तसेच एक्स्प्रेसवेवरून वेगाने धावणाऱ्या वाहनांचा वन्यजीवांवर परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.
या भूमिगत मार्गामुळे अभियंत्यांना डोंगराळ भागातून जाणारा लांब आणि वळणावळणाचा मार्ग टाळणे शक्य झाले. कोट्यातील हा विभाग एक्स्प्रेसवेतील शेवटच्या महत्त्वाच्या अपूर्ण दुव्यांपैकी एक होता. त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे आता दिल्ली ते मुंबईदरम्यान अखंड आणि वेगवान वाहतूक शक्य होणार आहे.
देशाच्या पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे हा एक मैलाचा दगड ठरणार असून प्रवासाचा वेळ निम्म्यावर आणण्यासोबतच अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना देणार असल्याचे मानले जात आहे.