भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर… ठाण्यात शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश – Marathi News | Bjp internal rift kalyan dombivli durgesh bagul joins shiv sena shinde faction


सुनील जाधव : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना घेतलेल्या भूमिकेवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय असलेले दुर्गेश बागुल यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

डोंबिवलीतील जोंधळे हॉलमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत बागुल यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बागुल यांच्या पक्षप्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले होते नंदू परब?

भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. परब यांनी म्हटले होते की, ‘ब्रिजभूषण सिंह यांना मी सलाम ठोकतो. त्यांनी एकच धक्का दिला. उत्तर प्रदेशमध्ये येऊन दाखव. राज ठाकरे गेले नाहीत, उत्तर भारतीय माणसाने दाखवून दिलं.’ परब यांच्या या टीकेनंतर बागुल यांनी नाराजी व्यक्त केली. ‘राज ठाकरेंवर टीका करा, मात्र परप्रांतीय नेत्यांचा आधार घेऊन मराठी अस्मितेला कमी लेखू नका, अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच ‘ज्या मराठी भाषेने 56 भाषांचा गौरव केला, त्या भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

नंदू परब यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागायला हवी. माफी माझी नव्हे, तर 15 कोटी मराठी जनतेची मागायला हवी होती, अशी भूमिका मांडली. मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा हा केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून तो भावनेशी जोडलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपमधील नाराजी समोर

भाजपमध्ये नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि पक्षांतर्गत गटबाजी यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा बागुल यांनी केला आहे. विशेषतः मराठी भाषेच्या मुद्द्यावर पक्षातील भूमिका मान्य नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, दुर्गेश बागुल यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून भाजपमधील नाराजी आता उघडपणे समोर आल्याने स्थानिक राजकारणात या पक्षांतराची जोरदार चर्चा रंगली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *