Last Updated:
कोल्हापूरला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता, पण सुट्टीत गावी आला की बापाच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबायचा. मात्र, नियतीला हे सुख मान्य नसावं असा भयंकर प्रकार घडला.
अहिल्यानगर: वडील कष्ट करून शेतात राबायचे अन् पोराला मोठं अधिकारी व्हायचं स्वप्न पाहायचे. याच स्वप्नांचा त्यांच्या डोळ्यादेख चुराडा झाला. डोळ्यात अश्रू आणि डोळ्यासमोर मुलाचा मृतदेह होता. इंजिनियर आणि अधिकारी होण्याचं स्वप्न तर राहूनच गेलं पण समोर पोराला असं निपचित पडलेलं पाहून बापाच्या काळजात चर्रर्र झालं. कुटुंबियांना आक्रोश केला, दु:खाचा डोंगर कोसळला. तरणा ताठा तरुण मुलगा डोळ्यादेखत एका क्षणात गेला.
बापाला वाटायचं, पोरगा मोठा होऊन इंजिनिअर होईल. शिकून सवरून घराची गरिबी दूर करेल. पोरगाही तितकाच गुणी. कोल्हापूरला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता, पण सुट्टीत गावी आला की बापाच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबायचा. मात्र, नियतीला हे सुख मान्य नसावं असा भयंकर प्रकार घडला. सोमवारी दुपारी शेतात बापाला मदत करत असतानाच आकाशातून थेट काळ कोसळला.
अंगावर वीज पडून २२ वर्षीय तरुण अभिषेक रूपचंद दरेकर याचा मृत्यू झाला. बापाच्या डोळ्यादेखत लेकाने तडफडून प्राण सोडल्याने संपूर्ण घेडेगाव परिसरावर शोककळा पसरली.
अभिषेक हा अत्यंत होतकरू तरुण होता. कोल्हापूरमध्ये इंजिनियरींग महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता.त्याला सुट्ट्या लागल्यामुळे तो आपल्या घेडेगावी घरी आला होता. सोमवारी दुपारी रूपचंद दरेकर हे शेतात काम करत होते.
हात पाय थकलेल्या बापाला कष्ट करताना पाहून अभिषेकला राहावं नाही. तोही मदतीसाठी शेतात गेला. बाप-लेक हसतखेळत काम करत होते. पण अचानक दुपारी ४ वाजेच्या सुमारास हवामान बदलले. काळेभोर ढग दाटून आले, सोसाट्याचा वारा सुटला आणि विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. काही समजण्याच्या आतच एक मोठी वीज थेट अभिषेकच्या अंगावर कोसळली.
वीज अंगावर कोसळताच अभिषेक गंभीररीत्या भाजला गेला आणि जमिनीवर कोसळला. आपल्या डोळ्यांसमोर लेकाला अशा अवस्थेत तडफडताना पाहून रूपचंद दरेकर यांचा थरकाप उडाला. त्यांनी जीवाच्या आकांताने हंबरडा फोडला. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत अभिषेकला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत अभिषेकनं प्राण सोडले होते. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. बापाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहात होते. तरणाताठं पोर डोळ्यादेखत गेल्याचं दु:ख पचवणं इतकी सोपं नव्हतं.
कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याचे स्वप्न उराशी बाळगून कोल्हापुरात शिक्षण घेणाऱ्या अभिषेकवर काळानं घाला घातला. असं काही होईल याचा विचारही स्वप्नातही विचार केला नव्हता. जो मुलगा उद्या कुटुंबाचा भक्कम आधार बनणार होता, त्याचीच अंत्ययात्रा काढण्याची वेळ या आई-वडिलांवर आली. अभिषेकच्या जाण्याने दरेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Mumbai,Maharashtra
