BCCI To Review Coach Gautam Gambhir Performance : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला 5 सामन्यांची टी-20 मालिका गमवावी लागली आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडविरुद्ध 2 पेक्षा जास्त सामन्यांची टी-20 मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, 2019 नंतर इंग्लंडविरुद्धचा हा पहिलाच द्विपक्षीय मालिका पराभव ठरला आहे.
या सलग पराभवांमुळे आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या करारावर आणि कोचिंग पद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गंभीर यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ 2027 पर्यंत असला, तरी सध्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे बीसीसीआय (BCCI) 2027 पर्यंत थांबण्याच्या मनःस्थितीत नाही. केवळ फलंदाजीच नव्हे, तर संपूर्ण कोचिंग स्टाफच्या कामगिरीची आता व्यापक पातळीवर समीक्षा केली जाणार असल्याचे वृत्त आहे.
‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय सध्या कोणताही घाईघाईने निर्णय घेणार नसली, तरी संघ सध्या ट्रान्झिशन फेज जात आहे, हे पराभवाचे कायमस्वरूपी कारण असू शकत नाही, असे बोर्डाचे मत आहे. आता कर्णधार आणि प्रशिक्षक दोघांनाही या फॉरमॅटमध्ये कामगिरी सुधारून दाखवावी लागेल, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
गौतम गंभीर यांनी केला होता संघाचा बचाव
काही दिवसांपूर्वीच गौतम गंभीर यांनी टी-20 मधील भारतीय संघाच्या खराब कामगिरीचा बचाव केला होता. ते म्हणाले होते की, “टी-20 विश्वचषक फायनल खेळणारी प्लेइंग-11 आणि सध्याचा संघ यात खूप मोठा फरक आहे. कर्णधारापासून ते सलामीवीरांपर्यंत सगळे बदलले आहेत. संघात हार्दिक पांड्या नाही आणि जसप्रीत बुमराहही नाही. जेव्हा तुम्ही नवीन संघ तयार करायला घेता, तेव्हा त्याला थोडा वेळ लागतो. आज आपल्याकडे 15 वर्षांचा खेळाडू ओपनिंग करतोय, प्रिन्स यादव आपला दुसराच सामना खेळत आहे आणि हर्षित राणा दुखापतीतून परतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निकाल महत्त्वाचे असतात यात शंका नाही, पण आपल्याला व्यावहारिक विचार करावा लागेल.”
कर्णधार श्रेयस अय्यरचीही गंभीर यांच्या सुरात सूर
सूर्यकुमार यादवला संघातून वगळल्यानंतर चाहत्यांच्या आणि दिग्गजांच्या टीकेचा धनी ठरलेला नवा टी-20 कर्णधार श्रेयस अय्यर यानेही चौथ्या सामन्यातील पराभवानंतर गंभीर यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला. अय्यर म्हणाला, “हा संघाचा बदलता काळ आहे आणि या प्रवासात आमच्याकडून चुका होणारच. आमच्यासाठी सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेणे किती महत्त्वाचे आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.” सध्या तरी गंभीर यांचे पद सुरक्षित असले, तरी बीसीसीआयने दिलेल्या या इशाऱ्यामुळे आगामी काळात गंभीर आणि श्रेयस अय्यर जोडीवर कामगिरी सुधारण्याचे प्रचंड दडपण असणार आहे.
हे ही वाचा –