फक्त गाणी पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायचे कॉलेजचे विद्यार्थी, चित्रपट ठरलेला सुपरहिट – Marathi News | 90s college students used to flock to theaters just to watch this song


आमिर खान आणि जूही चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटातील ‘पापा कहते हैं’, ‘ऐ मेरे हमसफर’ आणि ‘गजब का है दिन’ ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्याबाबत वितरक आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांना फारसा विश्वास नव्हता. जवळपास चार दशकांनंतर या चित्रपटाचे संगीतकार आनंद-मिलिंद यांनी त्या काळातील अनेक आठवणी आणि पडद्यामागचे रंजक किस्से उलगडले.

संगीत रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’च्या मंचावर उपस्थित असताना आनंद-मिलिंद यांनी ‘कयामत से कयामत तक’च्या निर्मितीपासून ते त्याच्या अभूतपूर्व यशापर्यंतचा प्रवास सांगितला. स्पर्धक अंशिका चोंकर आणि तनिष्क शुक्ला यांनी चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर सादरीकरण केल्यानंतर या आठवणींना उजाळा देण्यात आला.

आनंद यांनी सांगितले की, चित्रपट पूर्ण झाल्यानंतर वितरकांसाठी खास ट्रायल शो आयोजित करण्यात आला होता. मात्र, एकाही वितरकाने हा चित्रपट विकत घेण्याची तयारी दाखवली नाही. त्यावेळी अनेकांचे मत होते की, चित्रपटातील गाणी संथ आहेत, त्यात ऊर्जा नाही आणि ती प्रेक्षकांना आवडणार नाहीत.

त्या काळात केवळ जलद गतीची आणि जोशपूर्ण गाणीच लोकप्रिय होतात, अशी धारणा होती. त्यामुळे चित्रपटाचे संगीत हेच त्याचे कमकुवत दुवे असल्याचे वितरकांनी सांगितले. परिणामी, निर्माते नासिर हुसेन यांना मुंबईमध्ये हा चित्रपट स्वतःच प्रदर्शित करावा लागला.

गाणी पाहण्यासाठीच थिएटरमध्ये गर्दी

आनंद म्हणाले की, प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने मोठे यश मिळवले आणि त्यातील गाण्यांनी लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. सुरुवातीला ज्यांनी चित्रपट आणि संगीतावर टीका केली होती, त्यांचे सर्व अंदाज चुकीचे ठरले. आजही हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक संस्मरणीय चित्रपटांपैकी एक मानला जातो.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरचा एक वेगळाच अनुभवही आनंद यांनी सांगितला. ते नियमितपणे मुंबईतील बांद्रा येथील गेयटी-गॅलेक्सी थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहत असत. त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि अगदी बाराव्या आठवड्यातही सर्व शो हाऊसफुल होत होते. विशेष म्हणजे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी केवळ चित्रपटातील गाणी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी थिएटरमध्ये येत असत. त्यांना कोणते गाणे नेमक्या कोणत्या वेळी येणार आहे, याची पूर्ण माहिती होती. गाणे संपताच ते थिएटरच्या बाहेर पडत असत. हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील अत्यंत संस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *