क्रिकेट जगतात सध्या कर्णधार आणि उपकर्णधारपदाची संगीतखुर्ची चांगलीच चर्चेत आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये 2013-2024 पासून ज्या प्रकारे कपड्यांसारखे कर्णधार बदलले जात आहेत, जवळपास तशीच परिस्थिती भारतीय संघात उपकर्णधारांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे आणि टी-20 चे कर्णधार अनेकदा बदलले. कसोटीत बाबर आझमच्या जागी शान मसूदला आणले गेले, पण पुन्हा एकदा बाबरकडेच धुरा सोपवण्यात आली. दुसरीकडे, भारतीय संघात टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये वारंवार उपकर्णधार बदलले जात असल्याचं चित्र आहे.

टी-20 मध्ये उपकर्णधारांची संगीतखुर्ची

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला अक्षर पटेलकडे भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, आशिया चषक स्पर्धेपूर्वी त्याला हटवून शुभमन गिलला ही जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर टी-20 विश्वचषकापूर्वी गिलला संघातून ड्रॉप करण्यात आले आणि अक्षर पटेल पुन्हा एकदा उपकर्णधार बनला. भारताने विश्वचषक जिंकला आणि त्यात अक्षरने महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषकानंतर अक्षर संघात कायम असला, तरी उपकर्णधारपद मात्र तिलक वर्माकडे सोपवण्यात आले.

तिलक वर्माचा फॉर्म चिंतेचा विषय

उपकर्णधारपद मिळाले असले तरी तिलक वर्माचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फॉर्म गेल्या काही काळापासून अत्यंत खराब आहे. त्याची आवडती फलंदाजीची पोझिशन (क्रमांक 3 आणि 4) आता त्याच्या हातून निसटली आहे. क्रमांक तिसऱ्या आणि चौथ्यावर त्याने 34 डावांत 1,039 धावा केल्या आहे. तर पाचव्या क्रमांकावर 9 डावांत केवळ 224 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा सध्या फिनिशरच्या भूमिकेत अपयशी ठरत आहे. सध्या भारतीय संघात अव्वल 4 क्रमांकांवर कोणतीही जागा रिकामी नाही. अशा परिस्थितीत त्याला संघात स्थान टिकवणे कठीण झाले आहे. तसेच, फिरकी गोलंदाजीसमोरील त्याची कमकुवत बाजूही उघड झाली असून त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याची मागणी होत आहे. या वर्षात तिलक वर्माने भारतासाठी 14 सामन्यांत केवळ 29 च्या सरासरीने आणि 136 च्या स्ट्राईक रेटने 321 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे.

कसोटी संघातही उपकर्णधार बदलले

केवळ टी-20 च नव्हे, तर कसोटी क्रिकेटमध्येही उपकर्णधार सातत्याने बदलत आहेत. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराह कसोटी संघाचा उपकर्णधार होता. इंग्लंड दौऱ्यावर शुभमन गिलकडे कर्णधारपद असताना ऋषभ पंतला उपकर्णधार करण्यात आले. पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधारपदही भूषवले, पण नंतर त्याला या पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले. एकंदरीत, पाकिस्तानमध्ये जशी कर्णधारपदाची अस्थिरता आहे, तशीच काहीशी अनिश्चितता सध्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाबाबत पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा -

Team India Squad : IPL 2026 मध्ये शून्य विकेट… तरीही टीम इंडियात थेट एन्ट्री! सिलेक्टर्सच्या ‘या’ निर्णयाने सगळेच अवाक्, नेमका कोण हा खेळाडू?

Source link
पाकिस्तानचा कर्णधारपदाचा ट्रेंड भारतात उपकर्णधारासाठी लागू! कपड्यांसारखे खेळाडू बदलणारा नवा पॅटर्न, पुढचा नंबर 'या' खेळाडूचा?