Bhandara Accident News : भंडारा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये साकोली येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंडस्ट्रियल व्हिजिट संपवून परतत असताना हा अपघात घडला. साकोली येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिविल विभागाचे विद्यार्थी शैक्षणिक भेटीसाठी मोहाडी तालुक्यात गेले होते. संध्याकाळच्या सुमारास ही व्हिजिट संपवून दोघेही दुचाकीनं साकोलीकडे परत येत होते. यावेळी हा अपघात झाला. दरम्यान, एकाच वेळी दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
भीषण अपघात साकोली तालुक्यातील पळसपाणी ते चांदोरी या मार्गावर घडला
हा भीषण अपघात साकोली तालुक्यातील पळसपाणी ते चांदोरी या मार्गावर घडला. वळण मार्गावर दुचाकीवरून नियंत्रण सुटल्यानं त्यांची भरधाव दुचाकी रस्त्या शेजारील एका मोठ्या झाडावर थेट जाऊन आदळली. दुचाकीचा वेग जास्त असल्यानं हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावं कुणाल गोटेफोडे (21) आणि महेश टांगशेलवार (22) अशी आहेत. मृत कुणाल हा गोंदिया जिल्ह्यातील सौंदळ येथील रहिवासी असून महेश हा भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील चिकना तावशी या गावातील आहे. साकोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दापोली-साखळोली मार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू
दापोली-साखळोली मार्गावरील देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर इको वाहन आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फणसू येथील शुभम फडकले आणि त्याचा मित्र अमन खांबे हे दापोलीहून फणसूच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या इको वाहनासोबत त्यांची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की शुभम फडकले गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी हलवलं. शुभम याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात येत होतं; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फणसू परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वळणावर वारंवार दुर्घटना घडत असल्याने या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
आणखी वाचा