Last Updated:
न्यायाधीशांनी थेट आरोपी भीमराव कांबळे याला बोलावून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, “तू जे काही केलं, त्याचा तुला काही पश्चाताप होतोय का?” .
पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्यात आज विशेष न्यायालयात सुनावणीदरम्यान एक अत्यंत संतापजनक आणि मन सुन्न करणारा प्रकार पाहायला मिळाला. पोटच्या चिमुरडीला गमावलेल्या वडिलांनी न्यायाधीशांसमोर उभे राहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तर दुसरीकडे, ज्या नराधमाने हे कृत्य केले, त्याच्या चेहऱ्यावर गुन्ह्याची साधी जाणीव किंवा पश्चातापाचा लवलेशही दिसून आला नाही. न्यायाधीशांनी आरोपीच्या या क्रूर शरीरबोलीवर अत्यंत गंभीर निरीक्षण नोंदवले.
सुनावणीदरम्यान पीडित चिमुरडीचे वडील थेट न्यायाधीशांच्या समोर आले. आपल्या काळजाच्या तुकड्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचताना त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. त्यांनी न्यायालयात अत्यंत आर्त साद घालत मागणी केली, “माझ्या निष्पाप मुलीसोबत जे भयंकर कृत्य घडलं, तसं उद्या इतर कोणाच्याही मुलीसोबत घडू नये. या नराधमाने समाज पोखरण्याचं काम केलं आहे, म्हणूनच या आरोपीला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा द्या!”
न्यायाधीशांनी थेट आरोपी भीमराव कांबळे याला बोलावून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, “तू जे काही केलं, त्याचा तुला काही पश्चाताप होतोय का?” या गंभीर प्रश्नावर आरोपी भीमराव पूर्णपणे शांत राहिला. गुन्हा कबूल असूनही त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती, ना डोळ्यांत पश्चातापाचे अश्रू. प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची एक रेषही हालली नाही.
त्याचे ते थंड हावभाव आणि निर्ढावलेली शरीरबोली पाहताच न्यायाधीश अत्यंत संतापले. त्यांनी न्यायालयात स्पष्ट निरीक्षण नोंदवले की, “या आरोपीला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप होताना दिसत नाही.”
सुनावणीदरम्यान स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयाची दिशाभूल करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. तो म्हणाला, “त्या दिवशी मी तिला प्रेमाने गाठीशेव खायला घेऊन गेलो होतो. मी तिला मारलेलं नाही. मी तिला घेऊन जात असताना अचानक माझा पाय घसरला आणि आम्ही दोघेही खाली पडलो. त्यातच तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तिचा मृत्यू झाला.” मात्र, सरकारी पक्षाने वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे त्याचा हा खोटा बनाव तात्काळ उधळून लावला.
न्यायालयाने आरोपीच्या सामाजिक पार्श्वभूमीवरही कठोर टिप्पणी केली. “या संपूर्ण खटल्यादरम्यान आरोपीच्या कुटुंबातील एकही व्यक्ती कोर्टात आली नाही. त्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी कोणीच समोर आलेले नाही. केवळ कुटुंबानेच नव्हे, तर संपूर्ण समाजाने त्याला नाकारले आहे. असा क्रूर आणि निर्ढावलेला व्यक्ती समाजासाठी अत्यंत घातक आहे,” असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले.
या संपूर्ण प्रकरणाचा युक्तिवाद आणि निरीक्षणे पूर्ण झाली असून, आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयात सुनावल्या जाणाऱ्या अंतिम शिक्षेकडे लागले आहे. त्या महत्त्वाच्या प्रश्नावर आरोपीच्या चेहऱ्यावर ‘ते’ हावभाव; पाहताच न्यायाधीश म्हणाले ‘याला कोणताही पश्चाताप नाही’
Pune,Maharashtra
Jun 25, 2026 12:35 PM IST
नसरापूर प्रकरण: …त्या महत्त्वाच्या प्रश्नावर आरोपीच्या चेहऱ्यावर ‘ते’ हावभाव; पाहताच न्यायाधीश म्हणाले ‘याला कोणताही पश्चाताप नाही’
