धक्कादायक! गडचिरोलीत मध्यरात्री झोपेत असतानाच तरुणाला संपवलं, परिसरात खळबळ, तर अमरावतीत एकावर जीवघेणा हल्ला


Gadchiroli Crime News : गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. अहेरी तालुक्यात एक हत्याकांड उघडकीस आलं आहे. मध्यरात्री झोपेत असलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महेश ओडिला असे मृतकाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील रहिवासी होता. काही दिवसांपासून अहेरी परिसरात वास्तव्यास होता. 

आरोपी आणि मृतक यांच्यात काही कारणावरून वाद निर्माण झाला होता

आरोपी आणि मृतक यांच्यात काही कारणावरून वाद निर्माण झाला होता. याच वादातून आरोपी लक्ष्मण आलाम याने संतापाच्या भरात मध्यरात्री झोपेत असलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर आणि शरीरावर वार केल्याने तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हत्या करणारा आरोपी हा 55 वर्षीय असून त्याला एकच हात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यानंतरही त्याने अत्यंत क्रूरपणे ही हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपीवर गुन्हा दाखल केला. एका हाताच्या व्यक्तीने झोपेत असलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने हत्या केल्याच्या या घटनेमुळे अहेरी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

अमरावतीच्या वलगाव रोडवर तरुणावर जीवघेणा हल्ला, पैशांच्या वादातून घडली घटना

अमरावतीच्या वलगाव रोडवर तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शोएब अहमद एजाज अहमद असे जखमी तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर फायरिंग झाल्याच्या चर्चाने परिसरात खळबळ उडाली आहे. पैशांच्या वादातून घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नागपुरी गेट पोलिसांकडून तीन संशयितांना  ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात धक्कादायक घटना, तरुणाची हत्या करून अपघात झाल्याचा बनाव

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाची हत्या करून अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील कोळन्हावी – डांभुर्णी रस्त्यावर झालेल्या या घटनेचा उलगडा अखेर पोलिसांनी केला आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत 26 वर्षीय तरुण ठार झाला असा केला बनाव

कोळन्हावी ते डांभुर्णी या रस्त्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत 26 वर्षीय तरुण ठार झाला असा बनाव तिघांनी केला होता. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपासात सदर तरुणाचा अपघातात नव्हे तर खून झाल्याचे उघड झाले आहे. मयत तरूणाच्या तीन मित्रांनी त्याला दारू पाजून किनगाव डांभुर्णी रस्त्यादरम्यान असलेल्या पाटचारीवर नेऊन दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे, या प्रकरणी तीन तरुणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *