Anjali Damania: ‘देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्था’ ही मनी लाँड्रिंगसाठी वापरली जाणारी बोगस आणि शेल संस्था असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. ही संस्था 4 डिसेंबर 2001 रोजी स्थापन झाली, पण गेल्या 25 वर्षांत त्यांच्याकडे एकही गाडी नाही आणि त्यांनी कधीही निवडणूक घेतलेली नाही, असे त्या म्हणाल्या. 2018 मध्ये निवडणूक का घेतली नाही, या प्रश्नावर त्यांनी ‘2018 साली कोविडमुळे लॉकडाऊन होता’ असे अत्यंत हास्यास्पद आणि खोटे कारण लेखी स्वरूपात दिले होते, असे त्यांनी म्हटलं आहे. या संस्थेतील 28 सदस्यांच्या सह्या बोगस असल्याचा संशय आहे. एका व्यक्तीची 2001 मधील सही मराठीत तर 2013 मधील सही स्टायलिश इंग्रजीत असल्याचे त्या म्हणाल्या.
मुंबई बँकेकडून 2 हजार गाड्यांसाठी कर्ज देण्याची घोषणा
सहकार आयुक्तांनी (Commissioner of Cooperation) या प्रकरणात लक्ष घालून ही बोगस संस्था तात्काळ बंद करण्याचे आदेश द्यावेत. खोट्या सह्या आणि बोगस व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी. आपण या प्रकरणाचे सर्व कागदपत्रे आणि पुरावे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि पुणे सहकार आयुक्तांना पाठवणार असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. दमानिया म्हणाल्या की, ही संस्था ‘क’ श्रेणीमध्ये मोडते. संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून 2023-24 मध्ये त्यांचा निव्वळ नफा फक्त 941 रुपये होता. प्रवीण दरेकर यांच्या मुंबई बँकेत या संस्थेचे खाते असून, त्यात सध्या शून्य रुपये बॅलन्स आहे. बँक खात्यात शून्य रक्कम आणि कोणताही व्यवसाय नसतानाही, प्रवीण दरेकर यांनी या संस्थेला मुंबई बँकेकडून 2 हजार गाड्यांसाठी कर्ज देण्याची घोषणा केली आहे. हा पैसा सामान्य लोकांचा आणि सहकारी संस्थांचा असून तो या बोगस संस्थेसाठी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘देवाभाऊ टॅक्सी’ आणि राजकीय स्वार्थ
दमानिया यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या ‘भारत टॅक्सी’ला महाराष्ट्रात समर्थन देण्याऐवजी, त्याला डावलून या योजनेला ‘देवाभाऊ टॅक्सी’ असे नाव देण्यात आले आहे. फडणवीस यांचे उदात्तीकरण करण्यासाठी आणि सरकारी कामात कोणतीही अडवणूक होऊ नये यासाठी हे नाव वापरले गेल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. ओला-उबरला पर्याय म्हणून टॅक्सी सेवा येणे गरजेचे आहे, पण त्याला व्यक्तीपूजेऐवजी ‘सामान्यांची टॅक्सी’ किंवा ‘महाराष्ट्र टॅक्सी’ असे नाव द्यावे, अशी दमानिया यांनी मागणी केली. त्यांनी सांगितले की, याच संस्थेने सुरुवातीला गोरेगाव येथील माफकोची 3 एकर जमीन ‘सहकार भवन’ उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती. आता त्याऐवजी सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये पोलीस स्टेशनसाठी आरक्षित असलेला एक मोठा भूखंड त्यांना देण्यात आला असून, त्याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राजकीय पदाचा गैरवापर करून जमिनी लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!