Last Updated:
Shivrajyabhishek Sohala 2026: शिवभक्तांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे.
रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 353 व्या वर्धापन दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर 5 आणि 6 जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा साजरा केला जाणार आहे. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 40 समित्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे.
6 जून रोजी होणाऱ्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी रविवारी पाचाड येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महोत्सव समितीचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासन आणि समिती यांच्या समन्वयातून सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
गेल्या काही वर्षांपासून रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे यंदा गडावरील सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. पायरी मार्गाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, मार्गदर्शन केंद्रे, वैद्यकीय सेवा आणि सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. शिवभक्तांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे समितीने सांगितले.
सोहळ्याची सुरुवात 5 जून रोजी दुपारी 3.30 वाजता पाचाड येथील राजमाता जिजाऊसाहेबांच्या समाधीस अभिवादन करून होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता संभाजीराजे आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली रायगड चढण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी 4.15 वाजता नगारखाना येथे गडपूजनाचा कार्यक्रम होणार असून समिती आणि जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहतील.
सायंकाळी 4.30 वाजता संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’ या पारंपरिक युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रात्री 8 वाजता राजसदर येथे ‘जागर शिवशाहिरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा शाहिरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच रात्री 9 वाजता शिरकाई मंदिरात गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ आणि रात्री 9.30 वाजता जगदीश्वर मंदिरात वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
6 जून रोजी मुख्य राज्याभिषेक दिनाची सुरुवात सकाळी 7 वाजता नगारखाना येथे ध्वजारोहणाने होईल. शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. सकाळी 9.30 वाजता शिवछत्रपतींच्या पालखीचे राजसदर येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सवमूर्तीस अभिषेक करण्यात येणार असून सिंहासनारूढ मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक केला जाईल.
सकाळी 10.20 वाजता संभाजीराजे छत्रपती उपस्थित शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर 10.30 वाजता ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक’ या पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल. सकाळी 11 ते 12 या वेळेत पालखीचे जगदीश्वर मंदिरात आगमन होईल. दुपारी 12.15 वाजता वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन करून राज्याभिषेक सोहळ्याची सांगता होणार आहे.
शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साह, श्रद्धा आणि स्वराज्याच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरणार आहे.
Pune,Maharashtra
