Last Updated:
Thalapathy Vijay Pushpa Pose: नुकताच तमिळनाडू विधानसभेतील विजय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, चाहत्यांनी या व्हिडिओला थलापथीच्या वाढदिवसाची स्पेशल ट्रीट म्हणून घोषित केले आहे.
मुंबई: साऊथ इंडस्ट्री गाजवल्यानंतर थेट तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले सुपरस्टार थलापथी विजय राजकारणात आल्यानंतरही त्यांचा फिल्मी स्वॅग विसरलेले नाहीत. राज्याचा कारभार सांभाळतानाही त्यांचा डॅशिंग अंदाज विधानसभेत पाहायला मिळत आहे.
नुकताच तमिळनाडू विधानसभेतील विजय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, चाहत्यांनी या व्हिडिओला थलापथीच्या वाढदिवसाची स्पेशल ट्रीट म्हणून घोषित केले आहे. विरोधकांनी सभागृहात कितीही गदारोळ केला, तरी विजय यांचा किलर अंदाज तसूभरही कमी झाला नाही, हेच या व्हिडिओतून समोर आले आहे.
विधानसभेतही विजय यांचा तोरा कायम
विधानसभेच्या चालू अधिवेशनात मुख्यमंत्री विजय यांचे भाषण सुरू असतानाच, विरोधी पक्ष असलेल्या डीएमकेच्या आमदारांनी गदारोळ करत सभागृहातून थेट वॉकआऊट केले. मात्र, समोरून विरोधक उठून जात असतानाही विजय यांनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि स्वतःवर कोणताही दबाव येऊ दिला नाही.
भाषण संपवताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष जे.सी.डी. प्रभाकर यांच्याकडे एक अजब परवानगी मागितली. विजय म्हणाले, “काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी ज्याप्रमाणे एका फिल्मी अंदाजात आपले भाषण संपवले होते, अगदी त्याच स्टाईलमध्ये मलाही आजच्या भाषणाचा शेवट करायचा आहे.”
भर सभागृहात करून दाखवला ‘पुष्पा’ अवतार
अध्यक्षांनी परवानगी देताच विजय यांनी आपल्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणले आणि अत्यंत नाट्यमय पद्धतीने दाढीवरून हात फिरवत थेट अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमासारखा ‘मै झुकेगा नही’ चा इशारा करून दाखवला. हे करताना ते मिश्कीलपणे म्हणाले, “मी ज्यांच्यासाठी हा इशारा करत होतो, ते विरोधक तर आधीच सभागृह सोडून गेले आहेत; पण तरीही मला हा स्वॅग दाखवायचा होता.” विजय यांचा हा अंदाज पाहताच त्यांच्या पक्षाचे सर्व आमदार आणि सभागृहातील सदस्य आनंदाने ओरडू लागले आणि त्यांनी बाके वाजवून मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ येताच तुफान व्हायरल झाला आहे.
#WATCH | Chennai: Tamil Nadu Chief Minister C Joseph Vijay seeks permission from the Speaker and performs a cinematic gesture as he concludes his speech in the State Assembly.
(Video source: Tamil Nadu State Assembly) pic.twitter.com/Y7BlOXHkYI— ANI (@ANI) June 23, 2026
शेवटचा चित्रपट ‘जन नायकन’ अजूनही अडचणीत
२०२४ मध्ये स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करून थेट सत्तेत आलेल्या विजय यांनी आधीच जाहीर केले होते की, राजकारणात पूर्णवेळ सक्रिय झाल्यानंतर ते सिनेसृष्टीला रामराम ठोकतील. ‘लिओ’ आणि ‘गोट’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर, ‘जन नायकन’ हा त्यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट निवडणूक येण्यापूर्वीच प्रदर्शित होणार होता; मात्र गेल्या ६ महिन्यांपासून या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जात आहे. अजूनही या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही, शिवाय चित्रपटाचे काही भाग इंटरनेटवर लीक झाल्याचीही चर्चा आहे. चित्रपट अडकला असला, तरी विजय यांनी विधानसभेत आपल्या अभिनयाची झलक दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
Mumbai,Maharashtra
