राज्यात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील हॉटेल चालकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत रुस्तम आईस्क्रिम पार्लरची अचानक धाड टाकली. त्यावेळी स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा कायद्यान्वये दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. या वेळी तिथे उंदराचा देखील वावर आढळण्यात आला.
तपासणी दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुदत संपलेले कृत्रिम फ्लेवरिंग एजंट्स आणि एसेन्स आढळून आले. आईस्क्रीम बनवण्यासाठी यांचा पुढील वापर टाळण्यासाठी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खालील उत्पादने जागेवरच बेसिनमध्ये ओतून नष्ट करण्यात आली.
पिस्ता फ्लेवर : 2 नग (किंमत: 1028)
पाइनॲपल : 2नग (किंमत: 952)
स्वीट ऑरेंज : 3 नग (किंमत: 1242)
चेरी: 2 नग (किंमत: 740)
आलमंड (बदाम) : 1 नग (किंमत: ३५८)
अमेरिकन आईस्क्रीम सोडा: 2 नग (किंमत: 924)
मिक्स फ्रूट फ्लेवर :1 नग (किंमत: 500)
स्ट्रॉबेरी फ्लेवर :2 नग (किंमत: 1858)
ब्लॅक करंट फ्लेवर : 1 नग (किंमत: 1032)
रम जमैका : 1 नग (किंमत: 639)
लेमन : 1 नग (किंमत: 454)
प्लम कृत्रिम फ्लेवर: 1 नग (किंमत: 252)
आईस्क्रीमच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; फॅटचे प्रमाण कमी
या कारवाई दरम्यान विश्लेषणासाठी आईस्क्रीमचे अधिकृत नमुना घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या बाह्य प्रयोगशाळेतील अहवालांमध्ये येथील आईस्क्रीममध्ये स्निग्धांशाचे (fat) प्रमाण केवळ 7.94 % आढळले होते. FSSAI च्या मानकांनुसार आईस्क्रीममध्ये किमान 10%* फॅट असणे अनिवार्य आहे, त्यामुळे हे उत्पादन मानकांपेक्षा कमी दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले होते. एवढच नाही तर दुकानात आणि साठवणुकीच्या ठिकाणी जिवंत उंदीर आणि माशांचा देखील वावर आढळून आला. आईस्क्रीमसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली कोल्ड चेन (शीत साखळी) प्रक्रिया पाळण्यात अपयश* आले होते.
परवाना निलंबनाचे आदेश जारी
सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी तेजस्विनी व्ही. पाटील आणि आकाश चव्हाण यांनी केली. सह-आयुक्त (अन्न) पी. आर. सिंगारवाड आणि विभाग 1 चे सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा नियुक्त अधिकारी अनुपमा बाळासाहेब पाटील यांच्या देखरेखीखाली ही कारवाई केली.
कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय
प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रिमवर झालेली कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एफडीएच्या पथकाने या हॉटेलमधील अन्नपदार्थांचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. हा चाचणी अहवाल जोपर्यंत अधिकृतपणे येत नाही, तोपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.