‘इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..’ एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द


Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धबंदीचा हंगामी करार (MoU) संपुष्टात आल्याचे घोषित केले आहे, मात्र त्यांनी अमेरिकन प्रतिनिधींना इराणसोबत पुढील चर्चा करण्यास परवानगी दिली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) व्यावसायिक जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणमधील बंदर अब्बास (Bandar Abbas), सिरीक (Sirik) आणि केश्म बेट (Qeshm Island) येथील ठिकाणांवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले पूर्वीच्या हल्ल्यांपेक्षा चार ते पाच पटीने अधिक तीव्र होते. तणाव वाढल्यामुळे अमेरिकेने इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना रद्द केला आहे.

अमेरिकेनं आज (8 जुलै) पहाटे शस्त्रसंधीच्या काळात इराणवर हवाई हल्ला केला. यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) नुसार, अचूक शस्त्रास्त्रांनी 80 हून अधिक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. वॉशिंग्टनने या हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरले आहे. या हवाई हल्ल्यांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स, किनारी रडार, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन प्रक्षेपण स्थळे आणि आयआरजीसीच्या 60 हून अधिक लष्करी बोटींना लक्ष्य करण्यात आले. इराणी माध्यमांनुसार, सिरिक, केशम बेट आणि बंदर अब्बास येथे अनेक स्फोट झाले आणि काही भागांमध्ये आग लागली.

इराणचे अमेरिकेला प्रत्युत्तर

अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन आणि कुवेत येथे क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या दोन्ही देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. तसेच इराणच्या लष्कराने आणि नेत्यांनी अमेरिकेला या हल्ल्यांसाठी ‘खणखणीत प्रत्युत्तर’ देण्याचा इशारा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (ज्यांचा या युद्धाच्या सुरुवातीला मृत्यू झाला होता) यांच्या अंत्यसंस्काराचे विधी सुरू असतानाच अमेरिकेने हे हल्ले केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मते, हे सर्व संपले आहे. मला आता त्यांच्याशी कोणताही व्यवहार करायचा नाही, असे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यांच्याशी व्यवहार करणे हा निव्वळ वेळेचा अपव्यय असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 

त्यांचे नेतृत्वही विकृत लोकच करत आहेत

ट्रम्प म्हणाले की, ते नीच आहेत. नीच म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? ते नीच आहेत. ते विकृत लोक आहेत आणि त्यांचे नेतृत्वही विकृत लोकच करत आहेत. ते अत्यंत दुष्ट आणि हिंसक लोक आहेत. जर त्यांच्याकडे अण्वस्त्र असते, तर त्यांनी त्याचा नक्कीच वापर केला असता. जोपर्यंत माझा संबंध आहे, हे सर्व संपले आहे. इराणसोबतच्या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, आमचे प्रतिनिधी चर्चा करू शकतात, पण मला वाटते की ते त्यांचा वेळ वाया घालवत आहेत. 

अमेरिकन लष्करी तळांवर 85 हून अधिक लक्ष्यांवर हल्ला

प्रत्युत्तर म्हणून, इराणी लष्कराने बहरीन आणि कुवेत येथील अमेरिकन लष्करी तळांवरील 85 हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची अंत्ययात्रा नजफमध्ये सुरू आहे. अंत्ययात्रेच्या मार्गावर मोठ्या संख्येने देशवासिय उपस्थित आहेत. खामेनी यांचे पार्थिव मंगळवारी रात्री इराकच्या नजफमध्ये दाखल झाले. इराणमध्ये अनेक दिवस चाललेल्या अंत्ययात्रा आणि धार्मिक विधींनंतर पार्थिव एका विशेष विमानाने नजफमध्ये आणण्यात आले. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *