NEET पेपर फुटी प्रकरणाच्या चौकशीत टेलिग्रामच्या एका फिचरचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सॲपच्या मर्यादा टाळत आरोपींनी 4 GB पर्यंतच्या हाय-क्वॉलिटी स्कॅन PDF क्षणात लीक केल्या. ‘प्रायव्हेट माफिया’ सारख्या गुप्त ग्रुप्स आणि ओळख लपवण्याच्या टेलिग्रामच्या सुविधेमुळे अवघ्या काही तासांत हा पेपर हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला गेला. चला तर मग टेक अँगलने ही पेपर फुटी जाणून घेऊया.

4GB च्या हाय-क्वॉलिटी फाईल्स कशा शेअर केल्या?
CBI ने कोर्टात सादर केलेल्या अधिकृत पुराव्यांनुसार, या गुन्ह्यामध्ये टेलिग्रामच्या ‘लार्ज फाईल शेअरिंग’ (Large File Sharing) या विशिष्ट फीचरचा मुख्य वापर करण्यात आला. सामान्यतः व्हॉट्सॲपवर मोठ्या आकाराच्या फाईल्स मूळ गुणवत्तेत पाठवण्यावर मर्यादा असतात. मात्र, टेलिग्रामवर 2 ते 4 GB पर्यंतच्या फाईल्स कोणत्याही डेटा कॉम्प्रेशनशिवाय पाठवता येतात.
आरोपींनी याच फीचरचा फायदा घेतला. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) अंतर्गत स्त्रोताकडून लीक झालेली फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची मूळ प्रश्नपत्रिका ‘पोर्टेबल स्कॅनर’च्या सहाय्याने हाय-रेझोल्युशन PDF मध्ये रूपांतरित करण्यात आली. या 4 GB पर्यंतच्या अवाढव्य फाईल्स अत्यंत स्पष्ट आणि हाय-क्वॉलिटी असल्याने त्या टेलिग्रामवर क्षणात अपलोड आणि डाउनलोड करणे सोपे झाले.
‘प्रायव्हेट माफिया’ नेटवर्क आणि ओळख लपवण्याचे तंत्र
राजस्थान पोलिसांच्या विशेष मोहीम गटाने (SOG) आणि CBI ने उघडकीस आणल्यानुसार, टेलिग्रामवर “Private Mafia” नावाचा एक गुप्त ग्रुप सक्रिय होता. टेलिग्रामवर स्वतःचा मोबाईल नंबर लपवून केवळ ‘युझरनेम’ वापरून ग्रुपमध्ये सामील होता येत असल्यामुळे आरोपींना त्यांची खरी ओळख लपवणे सोपे गेले. याशिवाय, मेसेज ठराविक वेळेनंतर आपोआप डिलीट होणाऱ्या ‘सिक्रेट चॅट’ फिचरचा वापर करून डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका टेलिग्राम ग्रुपमध्ये 2 लाख सदस्यांची मर्यादा असल्याने, हा लीक झालेला पेपर अवघ्या 45 तास आधी देशातील विविध राज्यांमधील कोचिंग सेंटर्स आणि हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला गेला.
तपास यंत्रणांनी टेलिग्रामचा ‘डिजिटल ट्रेल’ (IP Address) आणि आर्थिक व्यवहारांचा तांत्रिक माग काढत शुभमचा शोध घेतला. पकडले जाण्याच्या भीतीने शुभमने त्याची हेअरस्टाईल बदलून स्वतःचे रूप बदलले होते. मात्र, सायबर सेलने तांत्रिक पाळत ठेवून त्याला नाशिकच्या इंदिरा नगर भागातील एका मंदिराकडे जाताना ताब्यात घेतले.
