Last Updated:
नाशिक विभागातील तब्बल 11 अधिकाऱ्यांचा समावेश असून या धडक कारवाईमुळे संपूर्ण एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कारभारात सुधारणा करण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त आणण्यासाठी महामंडळाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे. यात अमरावती विभागातील एका आगार व्यवस्थापकासह नाशिक विभागातील तब्बल 11 अधिकाऱ्यांचा समावेश असून या धडक कारवाईमुळे संपूर्ण एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखेडे यांच्यावर प्रादेशिक व्यवस्थापकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करणे आणि कामकाजात गंभीर हलगर्जीपणा करणे, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सध्या त्यांना निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणी सुरू असलेल्या विभागीय चौकशीत ते दोषी आढळल्यास त्यांना थेट एसटीच्या सेवेतून बडतर्फ (Dismiss) करण्याची कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नाशिक विभागात ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांसह 11 जणांचे निलंबन
एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात आजवरची सर्वात मोठी आणि अनपेक्षित कारवाई करण्यात आली आहे. कामात कसूर केल्याने एकाच वेळी तब्बल 11 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत 3 ‘क्लास वन’ (वर्ग-1) आणि 8 ‘क्लास टू’ (वर्ग-२) अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात दोन डेपो मॅनेजर (आगार व्यवस्थापक) आणि इतर 9 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मुख्यालयाकडून एका विशेष नियंत्रण समितीची स्थापना
एसटी महामंडळाचे ‘उत्पन्न वाढवणे आणि अनावश्यक खर्च कमी करणे’ हे मुख्य निकष समोर ठेवून कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मुख्यालयाकडून एका विशेष नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली होती. 10 जून रोजी एसटीच्या मुख्य कार्यालयातील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे महाव्यवस्थापक आणि नियोजन अधिकारी या दोन सदस्यीय उच्चस्तरीय समितीने नाशिक विभागात अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान नाशिक विभागातील विविध कार्यालयांत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात गंभीर त्रुटी आणि हलगर्जीपणा आढळून आला. या समितीच्या अहवालाच्या आधारेच ही सामूहिक निलंबनाची कारवाई करण्यात आली.
कामकाजावर परिणाम आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ
महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून आलेल्या या निलंबनाच्या ऑर्डर्स काही अधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्यास, त्या थेट पोस्टाद्वारे त्यांच्या पत्त्यावर पाठवल्या जातील, अशी कडक भूमिका प्रशासनाने घेतली आहे. एकाच वेळी तब्बल 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे नाशिक विभागीय कार्यालयातील दैनंदिन कामकाज अक्षरशः ठप्प झाल्याची चर्चा आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड धास्ती
या अनपेक्षित आणि धडक कारवाईमुळे एसटी महामंडळातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली असून संपूर्ण विभागात एकच खळबळ उडाली आहे. उत्पन्नात वाढ आणि खर्चात कपात या महामंडळाच्या उद्दिष्टांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना यापुढे गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
Mumbai,Maharashtra
