उद्धव ठाकरे दिपके यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार, भाजपा नेत्याचा खोचक टोला.. – Marathi News | Uddhav Thackeray will contest the election under Dipke’s leadership BJP Minister Jaykumar Gore


कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणात २० जुलै रोजी केलेल्या आंदोलनानंतर सर्वत्र त्याची चर्चा सुरु आहे. अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरातील त्याच्या घरी भेट दिली आहे. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी नेत्यांची रिघ लागली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी सरकारचे मंत्री देखील अभिजीत दिपके यांना भेटत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते देहूत भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमी श्रीक्षेत्र देहूमध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी होती. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

विरोधी पक्षाला काही काम उरलेलं नाही

दिल्लीत अमित शाह यांच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन सुरु केले आहे त्याबद्दल विचारता जयकुमारे गोरे म्हणाले की सध्या विरोधी पक्षाला काही काम उरलेलं नाही. विरोधी पक्षांनी सरकारवर अंकुश ठेवायचा असतो, यासाठी संसदेत चर्चा करणे अपेक्षित असते मात्र तसे न करता ते बाहेर अशी आंदोलनं करीत बसतात. जनतेच्या लक्षात या गोष्टी येत आहेत असेही ते म्हणाले.

ते अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील

अभिजित दिपके यांच्या भूमिकेसोबत दोन्ही शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबद्दल विचारले असता जयकुमार गोरे म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अस्तित्व आता राहिलेले नाही. ते त्यांचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील असा टोला गोरे यांनी यावेळी लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि नेते अभिजीत दिपके यांची भेट घेत असल्याच्या प्रश्नाला मात्र गोरे यांनी यावेळी बगल दिली.

मनोज जरांगेंचे समाधान होईल

मनोज जरांगे हे 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन करणार आहेत, त्यासंदर्भात विचारले असताना जयकुमार गोरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न ही बऱ्यापैकी सुटला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेशी सरकार सहमत आहे, मात्र, या संपूर्ण प्रक्रियेला काही कालावधी लागतो. निर्णय घेतला की ते लगेच पूर्ण होत नाही. मनोज जरांगेंचे समाधान होईल अशा पद्धतीने सरकार काम करेल असेही आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *