Last Updated:
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागताच ठाकरे गटाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कृष्णा पाटील आष्टेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी मोठा विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत एकूण ४५२ पैकी ४५१ सदस्यांनी मतदान केलं होते. यातील तब्बल ३३९ मतं मिळवत राजूरकर यांनी बाजी मारली. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना अवघ्या ८४ मतांवर समाधान मानावं लागलं.
हा निकाल लागताच ठाकरे गटाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कृष्णा पाटील आष्टेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वीच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेना शिंदे गटाला साथ दिली आहे. ही बंडखोरी उफाळून आली तरी कृष्णा पाटील आष्टेकर महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर मैदानात उतरले होते. त्यामुळे या निवडणुकीत नेमका निकाला काय लागणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता निकाल स्पष्ट झाला असून आष्टीकर यांचा पराभव झाला आहे.
पराभवाची बातमी समोर येताच ठाकरे गटाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली. “कृष्णा नागेश पाटील (अष्टेकर ) यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे” अशी पोस्ट राऊतांनी लिहिली. खासदार नागेश पाटील आष्टेकर यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्या मुलावर ही कारवाई केली.
कृष्णा नागेश पाटील (अष्टेकर )
यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2026
अशोक चव्हाणांची राजकीय खेळी यशस्वी
सुरुवातीला नांदेडची ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि अटीतटीची होईल असा राजकीय अंदाज वर्तवला जात होता. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपले राजकीय कसब पणाला लावत महायुतीतील सर्व घटक पक्षांची भक्कम मोट बांधली. केवळ महायुतीच नाही, तर मराठवाडा जनता विकास पार्टीच्या नगरसेवकांनाही त्यांनी आपल्या बाजूने वळवण्यात मोठे यश मिळवले.
मविआमध्ये फूट आणि काँग्रेसची पडझड
या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने ऐनवेळी आपला अधिकृत उमेदवार मागे घेऊन अपक्ष उमेदवार कृष्णा आष्टीकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यातच खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने मविआला मोठे खिंडार पडले.
काँग्रेसकडे स्वतःची ९२ आणि ठाकरे गटाकडे १९ मते असतानाही त्यांच्या पुरस्कृत उमेदवाराला केवळ ८४ मतेच मिळू शकली. काँग्रेसची तब्बल २७ मते फुटल्याचे आणि ती मते थेट भाजपच्या पारड्यात गेल्याचं स्पष्ट झालं आहे. नांदेड विधान परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने मते बाद झाली आहेत. ही मते नेमकी कोणत्या पक्षाची होती, यावरून आता राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Nanded,Maharashtra
Jun 22, 2026 12:07 PM IST
