आम्ही पाठीवर नाही तर छातीवर वार करणारे..; गोकुळ गीतेंच्या विजयानंतर शिवसेना नेत्याचा पलटवार – Marathi News | Jalgaon eknath shinde rebel shiv sena reshma kale reaction on gokul gite winning nashik vidhan parishad election 2026


विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला असला तरी नाशिकमध्ये मात्र महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी 389 मतं मिळवत बाजी मारली. त्यामुळे एका बाजूला महायुतीत जल्लोषाचं वातावरण असलं तरी दुसऱ्या बाजूला गोकुळ गीतेंच्या विजयामुळे महायुतीत विस्तव पडला आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गोकुळ गीते यांनी पाठीवर वार केला. आम्हाला पाठीवर वार करायचं शिकवलं नाही, आम्ही छातीवर वार करणारे आहोत,” असं त्या म्हणाल्या.

“आम्ही निष्ठावंत म्हणून महायुतीचा धर्म पाळला, मात्र नाशिकमध्ये हा धर्म पाळला गेला नाही याचं मोठं दुःख आहे. आम्ही जळगावात आमची बंडखोरी कायम ठेवली असती, तर आमचा देखील विजय झाला असता,” असं देखील रेश्मा काळे यांनी म्हटलं आहे. गोकुळ गीते यांनी माघार जाहीर केल्यानंतर जळगावमध्ये रेश्मा काळे यांनीसुद्धा माघार घेतली होती.

जळगाव विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात शिंदे गट बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून रेश्मा काळे मैदानात उतरल्या होत्या. अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्यांची समजूत काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले होते. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनीही यात हस्तक्षेप केल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर रेश्मा शिंदे यांनी थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.

एकीकडे जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींचा मोठा पाठिंबा मिळाला. तर दुसरीकडे नाशिकमध्ये पूर्णपणे वेगळं चित्र पहायला मिळालं. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणूक लढवली होती आणि त्यात आता त्यांचा विजय झाला आहे. निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र गोकुळ गीते यांनी माघार घेण्यास नकार देत निवडणुकीच्या मैदानात राहण्याचा निर्णय घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *