आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल


BJP Two Thirds Majority Rajya Sabha: तृणमूल कांग्रेस (TMC) मधील ताज्या राजकीय फुटीचा थेट परिणाम संसदेत होणार आहे. या बंडखोरीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मोठा फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यसभा निवडणुकीचे गणित आणि टीएमसीच्या बंडखोर खासदारांची भूमिका यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए राज्यसभेत दोन तृतियांश बहुमताच्या अत्यंत जवळ पोहोचू शकते. सध्याच्या आकडेवारीनुसार, एनडीए राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर आहे. मात्र, लोकसभेत बंडखोर खासदारांचे समर्थन मिळूनही एनडीए या जादूई आकड्यापासून अजूनही बरीच मागे आहे. राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके (Constitution Amendment Bills) मंजूर करण्यासाठी सरकारला दोन्ही सभागृहात दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता असते. नुकतेच 16 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत 131 वे घटनादुरुस्ती विधेयक दोन तृतियांश बहुमत न मिळाल्याने  54 मतांनी बाद झाले होते, त्यामुळे मोदी सरकारसाठी हा बहुमताचा आकडा गाठणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

तृणमूलमधील फुटीचा एनडीएला कसा फायदा होणार?

पश्चिम बंगालच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीचा थेट फायदा भाजप आणि एनडीएला राज्यसभेत जागा वाढवण्यासाठी होणार आहे. टीएमसीच्या 3 राज्यसभा खासदारांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालमधील 3 जागा रिक्त होणार आहेत. सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये या रिक्त जागांवर एनडीए समर्थित उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, लोकसभेतही टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी ‘एनसीपीआय’ (NCPI) पक्षाचे विलीनीकरण करून एनडीएला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे एनडीएचे लोकसभेतील संख्याबळ 294 वरून 314 पर्यंत पोहोचेल.

राज्यसभेत एनडीए 154 खासदारांपर्यंत पोहोचणार

सध्या राज्यसभेत एनडीएकडे 148 खासदार आहेत. 18 जून रोजी झारखंड आणि मिझोरममधील राज्यसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुका आणि काही अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यामुळे हा आकडा 151 पर्यंत पोहोचेल. त्यानंतर टीएमसीच्या फुटीमुळे मिळणाऱ्या पश्चिम बंगालमधील 3 जागा जोडल्यास राज्यसभेत एनडीएचे संख्याबळ 154 वर पोहोचू शकते. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या 245 असून, दोन तृतियांश बहुमतासाठी 163 खासदारांची गरज असते. म्हणजेच एनडीए या आकड्यापासून अवघ्या 9 जागा दूर राहील. आगामी काळात टीएमसीच्या आणखी खासदारांनी राजीनामे दिल्यास एनडीए राज्यसभेत दोन तृतियांश बहुमताचा टप्पा सहज पार करू शकते.

लोकसभेत अजूनही मोठे आव्हान

एकीकडे राज्यसभेत एनडीए भक्कम होत असताना लोकसभेत मात्र दोन तृतियांश बहुमताचा (363 जागा) टप्पा गाठणे अजूनही कठीण आहे. टीएमसीच्या 20 बंडखोरांच्या पाठिंब्यानंतरही एनडीए 314 जागांपर्यंतच पोहोचू शकते, जी आवश्यक आकड्यापेक्षा बरीच कमी आहे. दरम्यान, विरोधी पक्षांची ‘इंडिया’ (INDIA) ब्लॉक आघाडी राज्यसभेत 64 जागांवर आकुंचन पावली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने टीव्हीके (TVK) पक्षाला पाठिंबा दिल्याने द्रमुक (DMK) नाराज असून त्यांनी आघाडीपासून अंतर राखले आहे. तसेच आम आदमी पक्ष (AAP) देखील इंडिया ब्लॉकपासून वेगळा झाला आहे. अशा परिस्थितीत वायएसआरसीपी (YSRCP) आणि बीजेडी (BJD) या प्रादेशिक पक्षांची भूमिका कोणत्याही महत्त्वाच्या विधेयकावेळी किंगमेकर ठरू शकते.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *