Venezuela Earthquake : फुटबॉल जगतात खळबळ…; स्टार खेळाडूची 2 लहान मुलं अन् पत्नी बेपत्ता, घर ढिगाऱ्याखाली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?


Argentina Footballer Lucas Trejo Family Missing : वेनेझुएलामध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपात शेकडो लोकांचे प्राण गेले असून मोठे नुकसान झाले आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीने अर्जेंटिनाचे अनुभवी फुटबॉलपटू लुकास ट्रेजो (Lucas Trejo) यांचा सुखी संसार मोडला.. कोपा वेनेझुएला स्पर्धेच्या तयारीसाठी लुकास ट्रेजो आपल्या संघासोबत काराकासमध्ये होते. त्याच वेळी त्यांना बातमी मिळाली की, त्यांची बहुमजली इमारत भूकंपात पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे, ज्यामध्ये त्यांची पत्नी आणि दोन निष्पाप मुले राहत होती. या बातमीने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

दोन विनाशकारी भूकंपांचे धक्के

बुधवार, 24 जून 2026 च्या रात्री वेनेझुएलाची धरती एकापाठोपाठ एक आलेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी हादरली. पहिला धक्का 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. तर लोक या पहिल्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच 7.5 तीव्रतेचा दुसरा आणि अत्यंत घातक धक्का बसला.

राजधानी काराकासपासून सुमारे 12 किलोमीटर उत्तरेला असलेल्या ला गुएरा (प्राया ग्रांडे) या किनारी भागात या भूकंपाने सर्वाधिक हाहाकार माजवला. याच ठिकाणी लुकास ट्रेजो यांचे घर असलेली इमारत कोसळली. मूळचे अर्जेंटिनाच्या कॉर्डोबा येथील रहिवासी असलेल्या लुकास यांना मैदानावरील त्यांच्या मजबूत आणि लढाऊ खेळामुळे द जनरल म्हणून ओळखले जाते, परंतु या दुर्घटनेने त्यांना पूर्णपणे तोडून टाकले आहे.

सोशल मीडियावर ट्रेजो भावूक….

आपल्या कुटुंबाची कोणतीही माहिती न मिळाल्याने हताश झालेल्या ट्रेजो यांनी इन्स्टाग्रामवर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करून जगभरातील चाहत्यांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले की, “प्राया ग्रांडे (ला गुएरा) मधील आमची इमारत पूर्णपणे कोसळली आहे. मला माझ्या कुटुंबाबद्दल काहीही माहिती नाही. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि हा संदेश तिथल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा, जो तिथे उपस्थित आहे किंवा ज्याने त्यांना पाहिले असेल. मला फक्त एवढीच आशा आहे की ते त्या वेळी तिथे नसावेत. प्लीज, माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा.”

ट्रेजो यांनी त्यांची पत्नी यानिना मारनिला (यानि), मुलगा आरोन आणि मुलगी ऐनहोआ यांच्या सुरक्षिततेची काहीही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन बचाव पथक आणि चाहत्यांना केले आहे. ही पोस्ट क्रीडा जगतात वेगाने व्हायरल झाली असून सर्वजण त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहेत.

कोण आहेत लुकास ट्रेजो? (Argentina Footballer Lucas Trejo)

लुकास ट्रेजो हा ३८ वर्षीय वरिष्ठ फुटबॉलपटू आहे. तो एक अनुभवी डिफेंडर असून सध्या व्हेनेझुएलाच्या सेगुंडा डिव्हिजन क्लब मारिटिमोसाठी खेळतो. यापूर्वी तो व्हेनेझुएलाच्या प्रसिद्ध फुटबॉल क्लब मोनागास स्पोर्ट क्लब (मोनागास एससी) साठी खेळला होता. आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत, ट्रेजोने युरोप, अमेरिका, कोलंबिया, पेरू आणि मेक्सिकोमधील अनेक नामांकित क्लब्ससाठी व्यावसायिक फुटबॉल खेळला आहे.

हे ही वाचा –

Ind vs Ire 1st T20 Live Update : 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष! आयर्लंडविरुद्ध किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या LIVE अपडेट्स



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *