Vat Purnima 2026: वटपौर्णिमा व्रतामागील ‘ही’ पौराणिक कथा! ‘जी’ वाचल्याशिवाय पूजा अपूर्ण मानतात? कोण होती सावित्री? धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..


Vat Purnima 2026: वटपौर्णिमा आता काही तासांवर येऊन ठेपल्याने महिलांचा उत्साह अगदी शिगेला पोहचलाय.. वटपौर्णिमेच्या निमित्ताने सध्या विविध बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजारात विविध साहित्य, साज-शृंगाराचे साहित्य, पारंपारिक वस्त्र खरेदी करण्यासाठी महिलांची तुडूंब गर्दी पाहायला मिळत आहे. वटपौर्णिमा सणाबद्दल सांगायचं झालं तर हा दिवस पतीचे आरोग्य, दीर्घायुष्य, कुटुंबाचे सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभावे, अशी यामागील श्रद्धा आहे. या दिवशी विवाहित महिला सावित्रीला आदर्श मानून व्रत करतात. मात्र ज्या सावित्रीला आदर्श मानले जाते. ती सावित्री नेमकी कोण होती? वटपौर्णिमा व्रतामागील पौराणिक कथा नेमकी काय आहे? सर्वकाही जाणून घ्या…

सावित्री आणि सत्यवान यांची कथा – एका आदर्श वैवाहिक जीवनाचे प्रतीक (Vat Purnima 2026)

हिंदू परंपरेत एका आदर्श वैवाहिक जीवनाचे प्रतीक म्हणून सावित्री आणि सत्यवान यांची कथा मानली जाते. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य, निष्ठा आणि दृढ संकल्पाच्या बळावर यमराज यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले, असे पौराणिक कथेत वर्णन आहे. या कथेचा संदेश केवळ पतीच्या दीर्घायुष्यापुरता मर्यादित नसून, वैवाहिक नात्यातील विश्वास, समर्पण, परस्पर आदर आणि संकटांवर मात करण्याची जिद्द यांचे महत्त्व अधोरेखित करतो. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला सावित्रीला आदर्श मानून व्रत करतात. या व्रतामुळे पतीचे आरोग्य, दीर्घायुष्य, कुटुंबाचे सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभावे, अशी श्रद्धा आहे. सत्यवान–सावित्रीची कथा आजही संयम, कर्तव्यनिष्ठा, प्रेम आणि निष्ठेची प्रेरणा देणारी मानली जाते. त्यामुळे वटपौर्णिमा हा सण धार्मिक महत्त्वाबरोबरच कौटुंबिक मूल्ये आणि वैवाहिक बंध दृढ करणारा सण म्हणूनही ओळखला जातो.

सत्यवान–सावित्रीची पौराणिक कथा काय आहे?

धार्मिक मान्यतेनुसार, वटपौर्णिमेच्या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जाते. ही कथा पतिव्रतेचे सामर्थ्य, दृढनिश्चय आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानली जाते…

राजा अश्वपती यांची कन्या सावित्री अत्यंत रूपवान, विद्वान आणि तेजस्वी होती. विवाहासाठी तिने स्वतः सत्यवानाची निवड केली. मात्र, महर्षी नारद यांनी सत्यवानाचे आयुष्य अवघे एक वर्ष उरले असल्याचे भाकीत केले. तरीही सावित्रीने आपल्या निर्णयावर ठाम राहून सत्यवानाशी विवाह केला. भविष्यवाणीनुसार एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला. त्याचवेळी त्याला अचानक चक्कर आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडला. त्यानंतर यमराज सत्यवानाचा जीव घेण्यासाठी आले. सावित्रीने यमराजांचा पाठलाग केला. तिच्या ज्ञानपूर्ण, नम्र आणि धर्मनिष्ठ संवादाने यमराज प्रसन्न झाले आणि तिला अनेक वरदान दिली. सावित्रीने प्रथम आपल्या सासू-सासऱ्यांचे राज्य आणि दृष्टी परत मिळावी, नंतर वडिलांना पुत्रप्राप्ती व्हावी, अशी वरदाने मागितली. शेवटी तिने स्वतःला सत्यवानापासून शंभर पुत्र होण्याचे वरदान मागितले. यमराजांनी ते वरदान दिल्यानंतर त्यांना जाणवले की सत्यवान जिवंत नसल्यास ते वरदान पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी सावित्रीच्या पतिव्रतेपुढे नतमस्तक होत सत्यवानाचे प्राण परत केले. या घटनेनंतर सत्यवान पुन्हा जिवंत झाला. तेव्हापासून विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करून वटपौर्णिमेचे व्रत करतात. वडाचा वृक्ष दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानला जातो.

वटपौर्णिमेला सत्यवान-सावित्री पौराणिक कथेचे वाचन आवश्यक आहे का?

एक पारंपरिक पूजेचा महत्त्वाचा भाग म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यवान – सावित्रीची पौराणिक कथा वाचली किंवा ऐकली जाते, मात्र ते बंधनकारक किंवा अनिवार्य असल्याचा स्पष्ट उल्लेख सर्व धर्मग्रंथांमध्ये आढळत नाही. अनेक कुटुंबांमध्ये आणि स्थानिक परंपरेनुसार पूजा पूर्ण झाल्यानंतर सत्यवान–सावित्रीची कथा वाचली किंवा ऐकली जाते. यामागील उद्देश व्रताचे महत्त्व, त्यामागील संदेश आणि सावित्रीच्या निष्ठा, धैर्य व दृढनिश्चयाचे स्मरण करणे हा असतो. जर वेळेअभावी संपूर्ण कथा वाचणे शक्य नसेल, तर तिचा संक्षिप्त सारांश वाचणे किंवा मनोभावे स्मरण करणेही अनेक परंपरांमध्ये स्वीकारले जाते. श्रद्धा, भक्ती आणि प्रामाणिक भावनेने केलेली पूजा अधिक महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे, वटपौर्णिमेला सत्यवान–सावित्रीची कथा वाचणे ही शिफारस केलेली पारंपरिक प्रथा आहे; परंतु कथा न वाचल्यास व्रत अपूर्ण ठरते, असे सार्वत्रिक धार्मिक नियम नाहीत.

वटपौर्णिमा 2026 तिथी

वैदिक पंचांगानुसार, यंदा वटपौर्णिमा उदयतिथीनुसार सोमवार, 29 जून 2026 रोजी साजरी केली जाईल.

पौर्णिमा तिथी प्रारंभ: 29 जून 2026 रोजी पहाटे 3:07 वाजता.
पौर्णिमा तिथी समाप्ती: 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27 वाजता.

पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त…

वैदिक पंचांगानुसार, यंदा 29 जून रोजी सकाळी 06:30 ते दुपारी 12:30 या वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. शास्त्रांनुसार, वटपौर्णिमेची मुख्य पूजा करण्यासाठी ही वेळ अत्यंत फलदायी आणि सर्वोत्तम मानली गेली आहे. या 6 तासांच्या शुभ मुहूर्तात महिला आपली पूजा पूर्ण करू शकतात.

हेही वाचा :

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा पूजेचा ‘हा’ शुभ मुहूर्त, फक्त ‘हे’ 2 तास टाळा! तिथी, महत्त्व, पूजा पद्धत, पारंपारिक समजूत…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *