राजगड पाहायला निघाले मुंबईतील 20 पर्यटक; पुण्याच्या त्या घाटातच खोल दरीत कोसळली बस, किंकाळ्यांचा आवाज अन् ‘मृत्यूचं तांडव’ | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

ऐतिहासिक राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांची खाजगी ट्रॅव्हल्स बस पाबे घाटातील खोल दरीत कोसळली. या अत्यंत भीषण अपघातात दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला

पाबे घाटात भीषण अपघात
पाबे घाटात भीषण अपघात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटनांनी हादरलेल्या पुण्यातील आता आणखी एक बातमी समोर आली आहे. पुण्यातील निसर्गरम्य पाबे घाटातून एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. ऐतिहासिक राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांची खाजगी ट्रॅव्हल्स बस पाबे घाटातील खोल दरीत कोसळली. या अत्यंत भीषण अपघातात दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुंबईच्या अंधेरीतील २० जणांचा ग्रुप

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारे २० जण वीकेंडला ट्रेकिंग आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सने राजगड किल्ल्याकडे निघाले होते. रविवारी सकाळच्या सुमारास त्यांची बस वेल्हा आणि खानापूर दरम्यान असलेल्या दुर्गम पाबे घाटात आली असता, एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली ही ट्रॅव्हल्स थेट रस्त्यावरून खाली शेकडो फूट खोल दरीत कोसळली.

२ प्रवाशांचा जागीच अंत

ट्रॅव्हल्स दरीत कोसळताच घाटात प्रवाशांच्या किंकाळ्यांनी एकच खळबळ उडाली. गाडीमध्ये एकूण २० प्रवासी होते. अपघात इतका भीषण होता की, यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर अनेक प्रवासी गाडीतच अडकून पडले आणि गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने तातडीने दरीत उतरून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. रेस्क्यू टीमने स्थानिक लोकांच्या मदतीने ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या इतर १८ प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.

सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत घाटातून प्रवास करताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आता प्रशासनाकडून केले जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/

राजगड पाहायला निघाले मुंबईतील 20 पर्यटक; पुण्याच्या त्या घाटातच खोल दरीत कोसळली बस, किंकाळ्यांचा आवाज अन् ‘मृत्यूचं तांडव’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *