Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षाची पकड मजबूत ठेवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. पक्ष सोडून गेलेल्या आणि फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात 26 जून ते 29 जून या कालावधीत उद्धव ठाकरे सलग चार दिवसांचा झंझावाती दौरा करणार आहेत. बंडखोर खासदारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन संघटना पुन्हा उभी करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
दौऱ्याचे नियोजन असं असेल
- 26 जून: उद्धव ठाकरे यांच्या या चार दिवसीय दौऱ्याची अधिकृत सुरुवात 26 जूनपासून होत आहे. या काळात ते एकूण सहा मतदारसंघांना भेटी देतील.
- 27 जून (यवतमाळ, वाशिम, हिंगोली): दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 27 जून रोजी उद्धव ठाकरे विदर्भातील यवतमाळ–वाशिम आणि मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतील. या ठिकाणी ते स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
- 28 जून (परभणी आणि धाराशिव): 28 जून रोजी उद्धव ठाकरे परभणी आणि धाराशिव (उस्मानाबाद) या दोन मतदारसंघांमध्ये तळ ठोकतील. येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर भर दिला जाईल.
- 29 जून (शिर्डी): दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच 29 जून रोजी उद्धव ठाकरे शिर्डी मतदारसंघात जाणार आहेत. शिर्डीमध्ये जाऊन ते स्थानिक नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी चर्चा करून पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत मार्गदर्शन करतील.
उद्या मुंबईत दोन ठिकाणी भेटी
या भव्य दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून कामाला सुरुवात केली आहे. उद्या (21 जून) ते ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देणार आहेत. यामध्ये भांडुप आणि घाटकोपर या दोन भागांचा समावेश असून, येथे ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. आगामी दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून या मुंबईतील भेटींकडे पाहिले जात आहे. खासदार सोडून गेल्यानंतरही पक्षाची ताकद कमी झालेली नाही, हा संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. सलग चार दिवस सहा मतदारसंघांचा दौरा करून, फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात आपला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी ते पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे