ओमराजेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा प्रतिसाद; खासदार फोडाफोडीमागचं राज’कारण’ही सांगितलं, अमित शाहांनाही प्रत्युत्तर


मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) हे शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून आहे. त्यासाठी, दिल्लीत जाऊन त्यांनी स्वतंत्र गटाला आपला पाठिंबा दिल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यातच, आज त्यांचे वडिल पनवराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल सीबीआय कोर्टाने दिला. त्यामध्ये, माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे, हा ओमराजेंना मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत, आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. तर, शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावरही भाष्य केलं. मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार असल्याचं ओमराजेंनी म्हटलं. आता, ओमराजेंच्या भूमिकेवर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya thackeray) प्रतिक्रिया दिली आहे. 

परवा जे बैठकीला होते, ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे. उद्धव साहेबांचं मन मोठं आहे, ज्यांना परत यायचं आहे, त्याचं स्वागत आहे. पण, पक्षाच्या विरोधात जातील, त्यांच्यावर कारवाई होणार, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. ओमराजे निंबाळकरांशी कुठलाही संपर्क झाला नाही, त्यांचं तळ्यात मळ्यात असो पण डुबायला नको हे त्यांच्यावर आहे, असे म्हणत एकप्रकारे आदित्य ठाकरेंनी ओमराजेंना पुन्हा एकदा घरवापसीची साद घातली आहे. तर, अमित शाहांनी कोल्हापूर दौऱ्यात शिवसेना एकच आहे, ती एकनाथ शिंदेंची, असे म्हटले होते. यापूर्वी शिंदे गट म्हटलं जायचं. पण, आता गट म्हणायलाही शिवसेना उरली नसल्याची टीका अमित शाहांनी केली होती. त्यावरही, आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं.

महाराष्ट्राला माहिती शिवसेना एकच, ती कोणाची 

अमित शाहांच्या स्वागतासाठी गुलामांनी बॅनर लावले आहेत, असे म्हणत अमित शाहांच्या दौऱ्यावरुन एकनाथ शिंदेंवर टीका केली. तसेच, अमित शाहांनी शिवसेना पक्षाबाबत केलेल्या वक्तव्यावरही आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. असल्या फालतू गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही, महाराष्ट्राला माहिती आहे, शिवसेना कोणाची आहे. ज्यांना माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवलं, ते लोक आज शिवसेना आणि ठाकरे कुटुंब संपवायला निघाले आहेत. हे जनता आणि जग बघत आहे. जगभरात भारताची लोकशाही संपत असल्याची चर्चा आहे, असेही आदित्य यांनी म्हटले. 

ऑपरेशन तुडवा कुठंतरी होणार

एकच शिवसेना आहे, दुसरी गुलामांची टोळी आहे, एका चोराला मुख्यमंत्री बनायचंय, त्यासाठी हे चाललंय, असे म्हणत खासदार फोडाफोडी मागचं राजकारणही आदित्य ठाकरेंनी सांगितलं. संजय राऊतांनी सांगितलं, त्याप्रमाणे ऑपरेशन तुडवा हे कुठंतरी होऊ शकतं, असेही आदित्य यांनी म्हटले. 

हेही वाचा

Video: निकालानंतर नाराज, ओमराजेंनी राजकीय भूमिका सांगितली; उद्धव ठाकरे अन् आदित्य यांच्याबद्दलही बोलले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *