Last Updated:
Tejas Thackeray : दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ने विज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे
मुंबई: दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ने विज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हिमालयाच्या कुशीत आढळणाऱ्या ‘मिट्रिफोरा’ (Mitrephora) या वनस्पतीच्या एका अत्यंत दुर्मिळ आणि संपूर्णपणे नव्या प्रजातीचा शोध लावण्यात फाऊंडेशनला यश आले आहे. या नव्या प्रजातीला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावरून ‘मिट्रिफोरा रश्मी’ (Mitrephora rashmiae) असे नाव देण्यात आले आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सायन्स जर्नल ‘फेडेज रिपर्टोरियम’मध्ये (Feddes Repertorium) हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
तेजस ठाकरे, नवेंदू पागे आणि शिवम किश्वान या संशोधकांच्या पथकाने हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबान्सिरी जिल्ह्यातील दापोरिजो शहर आणि तलीहा गावाच्या दरम्यान, एका ओढ्याच्या काठावर सुमारे ४१० मीटर उंचीवर ही वनस्पती आढळली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सध्या या नव्या प्रजातीचे अवघे एकच झाड अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे.
काय आहे ‘मिट्रिफोरा रश्मी’ची वैशिष्ट्ये?
सीताफळ कुळातील वनस्पती: ही वनस्पती सदाहरित (Evergreen) असून तिची उंची सुमारे ७ मीटर आहे. याची पाने गडद हिरवी, जाडसर आणि १२ ते २४.५ सेमी लांब आहेत.
आकर्षक फुले आणि फळे: या वनस्पतीला मे ते नोव्हेंबर दरम्यान मोठी व आकर्षक फुले येतात आणि नोव्हेंबरनंतर फळे लागतात. फळे लांब, दंडगोलाकार आणि टोकदार देठाची असतात.
पाकळ्यांचे वेगळेपण: इतर प्रजातींमध्ये बाहेरील पाकळ्या मोठ्या असतात, मात्र या नवीन प्रजातीत बाहेरील आणि आतील पाकळ्या समान लांबीच्या आहेत. आतील तीन पाकळ्या एकत्र येऊन टोपीसारखा घुमट तयार करतात.
विज्ञानातील पहिलीच नोंद: या झाडावर नर आणि उभयलिंगी अशी दोन प्रकारची फुले आढळली. नर फुलात फक्त केसरदले, तर उभयलिंगी फुलात पुंकेसर आणि स्त्रीकेसर दोन्ही आहेत. मिट्रिफोरा वंशात अशी वैशिष्ट्ये यापूर्वी जगभरात कधीही नोंदवली गेली नव्हती.
असा लागला शोध…
संशोधकांनी अरुणाचलच्या जंगलात प्रत्यक्ष नमुने गोळा करून भारत व परदेशातील संग्रहालयातील वनस्पतींशी याची तुलना केली. जगभरात या वंशाच्या ५३ प्रजाती ज्ञात आहेत, त्या सर्वांपेक्षा ही वेगळी असल्याचे सिद्ध झाले.
वनसंपदा आणि वन्यजीव संशोधनात रश्मी ठाकरे यांनी नेहमीच तेजस ठाकरे आणि फाऊंडेशनला खंबीर पाठिंबा दिला. त्यांच्या याच योगदानाचा आदर राखत या नव्या प्रजातीचे नामकरण ‘मिट्रिफोरा रश्मी’ असे करण्यात आल्याचा विशेष उल्लेख शोधनिबंधात करण्यात आला आहे.
Mumbai,Maharashtra
