Team India Coaching Staff : टीम इंडियाला पराभवाचे धक्के; आता गंभीरचे दोन सहकारी साथ सोडण्याच्या वाटेवर, नेमकं काय घडतंय?


Indian Cricket Team Coaching Staff : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफबाबत मोठी चर्चा रंगली आहे. एका अहवालानुसार, भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्य लवकरच आपल्या पदाचा निरोप देऊ शकतात. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ नव्या स्वरूपात दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, गंभीर यांचा करार 2027 पर्यंत असल्याने त्यांच्या पदावर तत्काळ कोणताही धोका नसल्याचे मानले जात आहे.

टी-20 आणि कसोटीत प्रश्नचिन्ह

गौतम गंभीर यांची जुलै 2024 मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप आणि टी-20 विश्वचषक अशी मोठी जेतेपदे पटकावली. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. अलीकडेच श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध भारताला सलग पराभवांचा सामना करावा लागल्याने संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सपोर्ट स्टाफचा करार संपत आला

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफने बीसीसीआयसोबत 2+1 वर्षांचा करार केला होता. दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बोर्ड आणि संबंधित प्रशिक्षकांकडे तो आणखी एका वर्षासाठी वाढवण्याचा पर्याय आहे. मात्र, अहवालानुसार सपोर्ट स्टाफमधील एका प्रशिक्षकाचा आयपीएल फ्रँचायझीसोबत संपर्क सुरू असून, त्या फ्रँचायझीच्या इतर परदेशी लीगमध्येही संघ असल्याने ते तिकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पराभव नाही, तर अंतर्गत मतभेद ठरले कारण?

अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवांमुळे हे बदल होत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासूनच कोचिंग स्टाफमध्ये फेरबदलाची चर्चा सुरू होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात झालेल्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये मतभेद निर्माण झाल्याचेही वृत्तात म्हटले आहे. तसेच निवड समिती आणि कोचिंग स्टाफ यांच्यातही काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यावर नवा कोचिंग स्टाफ?

अहवालानुसार, इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होईल आणि त्यावेळी संघासोबत बदललेला कोचिंग स्टाफ असू शकतो. दरम्यान, बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने या संदर्भात प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, गौतम गंभीर यांना आयपीएलदरम्यान मोठा ब्रेक मिळाला होता. तसेच झिम्बाब्वे दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण यांना पाठवण्याच्या चर्चेवरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आशियाई क्रीडा स्पर्धांसाठीही लक्ष्मण यांना पाठवण्याची चर्चा सुरू असल्याने, बोर्ड नवीन पर्यायांचा विचार करत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सध्या बीसीसीआयने कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल होणार असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे या सर्व घडामोडी अहवालांवर आधारित असून, इंग्लंड टी-20 मालिका संपल्यानंतरच याबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा –

Ind vs Eng 5th T20 : संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT… सूर्यांश शेडगेचं पदार्पण? इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *