Sonu Sood Spoke On Jantar Mantar Protest: सोमवारी तरुणांच्या एल्गारानं राजधानी दिल्ली (Delhi News) गरजली. जंतर-मंतर (Jantar Mantar) इथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनादरम्यान आणि संसदेकडे निघालेल्या त्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. यावेळी देशाचं भविष्य असणाऱ्या तरुणांच्या पाठीशी सर्वच स्तरांतील दिग्गज ठामपणे उभे राहिले. बॉलिवूडमधील (Bollywood News) अनेक व्यक्तींनीही या घटनेविरुद्ध आवाज उठवला आहे. अशातच, गरिबांचा मसिहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनू सूद (Sonu Sood) यानंही ट्वीट करुन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा निषेध केला आहे.
नीट (NEET) आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू असताना, मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी आंदोलनस्थळी भेट दिली. सोमवारी, टेलिव्हिजन स्टार्सपासून ते बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या या मागणीच्या समर्थनार्थ आवाज उठवला. सोनू सूदनं एका ट्वीटद्वारे पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जवर टीका केली.
“आमच्या विद्यार्थ्यांना लाठ्या नाही, मायेनं उराशी कवटाळणारे हाथ हवेत…” (Sonu Sood On CJP Protest)
सोनू सूदनं लिहिलंय की, “आपल्या विद्यार्थ्यांना लाठ्यांची नाही, तर त्यांना मायेनं जवळ घेणाऱ्या, उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज आहे…” मात्र, सोनू सूदच्या या पोस्टवर लोकांच्या संमिश्र कमेंट्स दिसून आल्यात. एका युजरनं कमेंट केलीय की, “सर, मला तुमच्याबद्दल खूप आदर होता, पण देशविरोधी CJP चं समर्थन करून तुम्ही तो आदर गमावलाय…”

एका व्यक्तीनं टिका केलीय की, “तुम्ही हुशार विद्यार्थ्यांबद्दल काहीच बोलला नाहीत…” दुसऱ्या एकानं म्हटलंय की, “तुम्ही देशातील जनतेची बाजू मांडणारे व्यक्ती असायला हवे होतात, तरीही तुम्ही काहीच लिहिलेलं नाही, हुशार विद्यार्थ्यांबद्दल एक शब्दही काढला नाही…” दरम्यान, आणखी एकानं सोनूला प्रश्न विचारलाय की, “विद्यार्थ्यांनी केलेली दगडफेक तुम्हाला दिसली नाही का?” आणखी एका प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, “या आंदोलनांमध्ये ‘नीट’ (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे…”
दीया मिर्झाचाही आंदोलनाला पाठिंबा
दीया मिर्झा हिनंही सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केलाय. रात्री उशिरा पोस्ट करत ती म्हणाली की, “नागरिकांना विश्वास वाटेल अशा शिक्षण पद्धतीची मागणी करणं, याकडे कधीही बंडखोरी किंवा अवज्ञेची कृती म्हणून पाहिलं जाऊ नये. ही एक आशेची अभिव्यक्ती आहे. आज समोर येत असलेली दृश्य पाहणं कठीण आहे. उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी शांततापूर्णरीत्या एकत्र जमलेले तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक हे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाण्यास आणि आदराची वागणूक मिळण्यास पात्र आहेत…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :