Sonu Nigam On CJP Protest: CJP आंदोलनावर प्रतिक्रिया देण्यास सोनू निगमने दिला स्पष्ट नकार; प्रश्न विचारताच वैतागला, VIDEO


Sonu Nigam: गायक सोनू निगम (Sonu Nigam) अलीकडेच एका कार्यक्रमाला उपस्थित होता. यावेळी त्याला NEET पेपर लीक प्रकरण आणि त्याविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या विषयावर प्रतिक्रिया देण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. या संवादाचा एक छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून,यावर  सोनू निगमने या विषयावर बोलायला हवे होते का?अशा चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय म्हणाला सोनू निगम?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पत्रकार सोनू निगमला विद्यार्थी आंदोलनाबाबत त्याचे मत विचारताना दिसतात. मात्र, “मी इथे या विषयावर बोलण्यासाठी आलेलो नाही,” असे सांगत त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पत्रकारांनी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर सोनू काहीसा नाराज झाल्याचं दिसलं. नंतर तो, “अभी हो गया, बस,” असे म्हणत तिथून निघून गेला.

सोनू निगमच्या नकारावर काय प्रतिक्रिया?

हा संवाद नेमका कोणत्या कार्यक्रमात किंवा कुठे झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी सोनू निगमवर ट्रोलिंग सुरु केलं. अनेक अभिनेते, गायक आणि इतर  विद्यार्थी आंदोलनाला सेलिब्रेटींनी पाठिंबा दिला असताना सोनूने मौन बाळगल्याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली. एका युजरने लिहिलं, ‘प्रतिभावान असणं म्हणजे चांगला माणूस असणं नाही.’ तर दुसऱ्यानं, ‘देशाच्या आणि विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तथाकथित सेलिब्रिटी गप्प का राहतात? असा सवाल उपस्थित केला. दुसरीकडे काहींनी सोनू निगमची बाजूही घेतली. प्रत्येक संवेदनशील किंवा राजकीय विषयावर सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा ठेवू नये,असंही काहींनी म्हटलं.

एका युजरने लिहिले,”सोनूला दोष देता येणार नाही. अजान प्रकरणावर मत व्यक्त केल्यानंतर त्याला बॉलिवूडमध्ये बहिष्काराला सामोरं जावं लागलं होत. नंतर त्याचं करिअर पुन्हा रुळावर आलं. त्यामुळे आता कोणत्याही विषयावर बोलताना तो अत्यंत सावध बोलताना दिसतोय. सोनू निगमने अद्याप NEET आंदोलनाबाबत आपल्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर अधिकृत भूमिका मांडलेली नाही. 

आतापर्यंत कोणी कोणी दिला आंदोलनाला पाठींबा?

दरम्यान, त्याचवेळी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. सलमान खान, अनुपम खेर, सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख आणि अदिती राव हैदरी यांनी आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. याआधी शबाना आझमी, प्रकाश राज आणि रॅपर हनुमानकाइंड यांनी नवी दिल्लीतील ‘चलो संसद’ मोर्चात सहभाग घेतला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर केल्याच्याही घटना घडल्या. मुंबईत हुमा कुरेशी, साकिब सलीम, आयेशा खान आणि शालिनी पांडे यांनीही विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या आरोपांनंतर हे आंदोलन सुरू झाले असून, आता ते देशातील अनेक शहरांमध्ये पसरले आहे. आंदोलनकर्ते या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *