Siddaramaiah : अखेर सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार, नव्या सरकारची स्थापना कधी?


बंगळुरु : भारतात सध्या काँग्रेसची तीन राज्यात स्वबळावर सत्ता आहे. या कर्नाटक, केरळ आणि हिमाचल प्रदेश यापैकी कर्नाटकमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्री बदल करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सिद्धारामय्या (Siddaramaiah) यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आज दुपारी अडीच वाजता सिद्धारामय्या लोकभवनमध्ये राज्यपालांच्या खासगी सचिवांकडे  राजीनामा सोपवणार असल्याची माहिती आहे. राजीनामा सोपवल्यानंतर सिद्धारामय्या तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून विद्यमान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivkumar) यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळणार आहे. सिद्धारामय्या यांनीच मुख्यमंत्री पदासाठी डीके शिवकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. 
  
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी पद सोडण्याच्या निर्णय घोषणा करताना सर्व मंत्र्याचे आभार मानले. यावेळी त्यांनी राज्याच्या वित्तीय स्थिती संदर्भात चर्चा देखील केली.  गेल्या तीन वर्षात  काँग्रेस सरकारनं काय काय केलं?, निवडणुकीच्या काळात आश्वासन दिलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी कोणती आव्हानं आली होती, याची माहिती देखील सिद्धारामय्या यांनी दिली. 

मंगळवारी  राहुल गांधी यांनी सिद्धारामय्या  यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सिद्धारामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात सत्ता स्थापनेसंदर्भात जो करार झाला होता त्यानुसार सिद्धारामय्या यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आहे. 

डीके शिवकुमार हे सध्या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे जलसंपदा, बंगळुरु शहर विकास  प्राधिकरण आणि नगररचना विभाग आहेत. याशिवाय ते कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. कर्नाटकमध्ये नव्या सरकारची स्थापना कधी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. डीके शिवकुमार यांच्यासोबत चार उपमुख्यमंत्री असतील, अशा चर्चा आहेत. 

डीके शिवकुमार काँग्रेसचे संकटमोचक

डीके शिवकुमार कर्नाटकमधील कनकपुरा विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. एकदाही त्यांचा पराभव झालेला नाही. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून डीके शिवकुमार प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचे संकटमोचक म्हणून यशस्वी ठरले होते. गुजरातमध्ये 2017 च्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार त्यांनी निवडून आणला होता. 

डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद, जेडीएसची कोंडी?

डीके शिवकुमार कर्नाटक काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष असताना ते मुख्यमंत्री होतील या शक्यतेमुळं राज्यातील वोक्कलिग समाजानं काँग्रेसला मोठ्या संख्येनं मतदान केलं, याचा कुमारस्वामी यांच्या जनता दल निधर्मी पक्षाला फटका बसला. राजकीय जाणकारांच्या मते  2023 मध्ये म्हैसूर विभागातील  वोक्कलिगा समाजाचं मोठं मतदान  डीके शिवकुमार यांच्यासाठी काँग्रेसकडे आलं. त्यामुळं डीके शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यास, कुमारस्वामी यांच्या जेडीएससमोरील आव्हानं वाढतील.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *