Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: लक्ष्मण उत्तेकर (Director Laxman Utekar) दिग्दर्शित आणि श्रद्धा कपूर (Actor Shraddha Kapoor) स्टारर आगामी सिनेमा ‘ईठा’ (Eetha Movie) सध्या चर्चेत आहे. सिनेमाचे टीझर (Eetha Movie Teaser) रिलीज होताच, या सिनेमाच्या जोरदार चर्चा रंगल्या. श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) लूक, तिचा अभिनयाची झलक पाहूनच चाहते भलतेच खूश झाले. खरं तर या सिनेमात श्रद्धा कपूर तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांची भूमिका साकारणार आहे. पण, टीझर रिलीज होताच, आता श्रद्धा कपूरचा सिनेमा अडचणींच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमाच्या नावावरुन मोठा गदारोळ सुरू असतानाच आता दिग्गज तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रियाही समोर आलीय. नाव बदलण्याच्या मागणीसोबतच विठाबाईंच्या कुटुंबीयांनी मोठी मागणी केलीय. त्यासोबतच 3 जुलैपर्यंत निर्मात्यांनी उत्तर दिलं नाहीतर योग्य ती कायदेशीर कारवाई करू असा इशाराही विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी दिलाय.
विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांची नेमकी मागणी काय? (Vithabai Narayangaonkar Family Demand)
श्रद्धा कपूर स्टारर ‘ईठा’ सिनेमाचा टीझर जोरदार गाजला. त्यानंतर आता यावर विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘आवाज लोकशाहीचा’ (Aawaz Lokshahicha) युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. मुलाखतीत बोलताना विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोन मोठ्या मागण्या सिनेमाच्या निर्मात्यांकडे केल्यात.
‘ईठा’ सिनेमाच्या टीझरमध्ये बाळाला जन्म दिल्याचं दाखवण्यात आलेलं. याबाबत विठाबाई यांचा मुलगा कैलास नारायणगावकर म्हणाले की, “या सिनेमाबाबत आम्हाला एकाच आठवड्यापूर्वी समजलं. आम्ही टीझर पाहिला आणि त्यामध्ये माझा जन्म स्टेजमागे झाल्याचं दाखवण्यात आलंय… आमच्या आईचा संघर्ष बॉलिवूड सिनेमात दाखवला जातोय, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. पण, याआधीच आम्हाला हे सांगायला हवं होतं. आम्ही त्यांच्याबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल आणखी माहिती दिली असती आणि यामुळे सिनेमा अधिक आशयघन झाला असता…”
“ग्रामीण भागामध्ये ‘विठा’ या शब्दाला ‘ईठा’ बोललं जातं हे मान्य आहे. पण, त्यांचं खरं नाव हे विठाबाई आहे. आजच्या नव्या पिढीला त्यांच्या खऱ्या नावानं इतिहास कळाला तर समाधान वाटेल, लक्ष्मण उत्तेकर सिनेमा काढत आहेत याचा अभिमान आहे, पण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी तो आमच्या कुटुंबाला दाखवावा ही आमची इच्छा आहे. जर सिनेमामध्ये काही आक्षेपार्ह असेल, तर ते सांगता येईल आणि काढून टाकता येईल…”, अशी मागणी विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
“ईठा’ नाव बदलून विठा करावं…”
विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी सिनेमाच्या नावावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील कोणत्याही लोककलावंताच्या नावापुढे त्याच्या गावाचं नाव लागलं तरंच तो खरा कलावंत म्हणून शोभून दिसतो. दुसरं जर नाव आलं ना, तर ते कळत नाही, नेमकं हे काय आहे? सिनेमाच्या निर्मात्यांकडे आमची मागणी आहे की, त्यांनी ‘ईठा’ नाव बदलून विठा करावं आणि नावापुढे सबटायटलमध्ये नारायणगावकर असं पूर्ण नाव द्यावं किंवा विठाबाई नारायणगांवकर करावं. अशा दोन ते तीन सूचना मेलद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचवल्या आहेत. आमचं फक्त नावाबद्दल म्हणणं आहे, बाकी सिनेमा तयार करण्यावरून आमचा विरोध नाही…”
‘ईठा’ नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा विरोध
मोहित नारायणगावकर पुढे बोलताना म्हणाले की, “विठाबाईंच्या जीवनावर आधारित ‘तमाशा: विठाबाईंच्या आयुष्याचा’ या नावाचं एक पुस्तकही आहे. या पुस्तकावर आमचा आक्षेप आहे. कारण या पुस्तकाचे लेखक फक्त एक ते दोनवेळा आमच्याकडे आलेले. पण, नंतर त्यांनी संपूर्ण पुस्तक ऐकीव माहितीवरून लिहिलंय. विठाबाईंचं चरित्र म्हणून ते पुस्तक लिहिलंय, पण त्यातली पन्नास टक्के माहिती ही पूर्णपणे खोटी आहे आणि निर्मात्यांनी पुस्तकाच्या आधारे तो सिनेमा तयार केलाय. पुस्तकामध्ये जे घडलं नाही, ते घडवलं गेलं आहे, त्यामुळे विठाबाई यांच्या कुटुंबीयांना माहीत असलेल्या इतिहासाची जर माहिती घेतली असती तर सिनेमा अजून चांगला झाला असता. त्याकाळी तमाशाच्या फडाचं नाव ‘भाऊ बापू नारायणगावकर’ असं होतं, पण सिनेमामध्ये फक्त ‘भाऊ गावकर’ नाव दिलंय, त्यामुळे हे ‘गावकर’ कोण हे स्पष्ट होत नाही, ‘नारायणगावकर’ हे नाव असल्याशिवाय सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही…”
“जर त्यांनी संपर्क केला नाही तर, 100 टक्के रीतसर कारवाई करणार…”
विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्याशी मेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं मुलाखतीत बोलताना सांगितलंय, मात्र अद्याप एकही फोन आला नसल्याची खंतही कुटुंबीयांनी व्यक्त केलीय. ते म्हणाले की, “जर त्यांनी संपर्क केला नाही तर, 100 टक्के रीतसर कारवाई करणार आहे. 2 ते 3 जुलैपर्यंत त्यांनी संपर्क केला तर ठीक, नाही तर जे काही कायदेशीर असेल त्याप्रमाणे कारवाई करणार. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या वकिलांशी चर्चा झाली असून पुढे काय होते यावर पुढचा निर्णय ठरवू, सिनेमा जर 100 टक्के चांगला असेल तर डोक्यावर घेऊ, पण यामध्ये आक्षेपार्ह काही असेल तर मात्र यावर कायदेशीर मार्गानं हे थांबवू…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा