Sharib Hashmi Wife Diagnos Six Times Cancer: ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) वेब सीरिजमध्ये जेवढी अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी साकारलेला श्रीकांत तिवारी गाजला, त्याच्या बरोबरीनंच आणखी एक पात्र गाजलेलं ते म्हणजे, ‘जेके तळपदे’. बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) शरीब हाश्मी (Sharib Hashmi) यानं ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man Web Series) सीरिजमध्ये ‘जेके तळपदे’ ही भूमिका साकारुन सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. यापूर्वीही शरीब हाश्मी यानं फिल्म इंडस्ट्रीत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. पण, तुम्हाला माहितीय का? मनोज वाजपेयींसोबत ‘द फॅमिली मॅन’ वेब सीरिजमध्ये जरी शरीब हाश्मीनं सहाय्यक भूमिका साकारली असली, तरीसुद्धा खऱ्या आयुष्यात मात्र तो एक आदर्श ‘फॅमिली मॅन’ आहे.
नुकत्याच एका पॉडकास्टला शरीब हाश्मी आणि त्याची पत्नी नसरिन हाश्मी (Nasreen Hashmi) यांनी मुलाखत दिली. Hauterrfly सोबतच्या पॉडकास्टमध्ये बोलताना या जोडप्यानं त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. अभिनेच्याच्या पत्नीला आतापर्यंत पाच वेळा तोंडाच्या कर्करोगाचं (Oral Cancer) निदान झालेलं. 2018 मध्ये जेव्हा तिला पहिल्यांदा आजाराचं निदान झालं, तेव्हापासून ती या आजाराशी लढा देत आहे. यावर बोलताना अभिनेत्यानं सांगितलं की, “नसरीनचा कर्करोग यापूर्वीच पाच वेळा पुन्हा उद्भवला आहे आणि आता तो सहाव्यांदा परतला आहे. यावेळी, तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरला आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशा कठीण काळात, मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात.”
शरीब हाश्मी पुढे बोलताना म्हणाला की, “नसरीनच्या धैर्यामुळे संपूर्ण कुटुंबालाच बळ मिळालंय. तिनं नेहमीच या परिस्थितीचा अत्यंत धैर्यानं सामना केलाय… ती इतक्या निकरानं लढा देतेय की, तिच्या सोबतीनं आम्ही सर्वजणही लढवय्ये बनलोत.”
शरीब हाश्मीची पत्नीला खंबीर साथ (Sharib Hashmi On Wife Nasreen Hashmi)
अभिनेत्याची पत्नी नसरीन हिनंही सांगितलंय की, रुग्णालयातील प्रत्येक व्हिजिट आणि प्रत्येक शस्त्रक्रियेच्या वेळी शरीब हाश्मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. नसरिन हाश्मी म्हणाली की, “तो कितीही व्यस्त असला किंवा शूटिंगमध्ये कितीही मग्न असला, तरीही तो कसाबसा वेळ काढून रुग्णालयात पोहोचायचाच… मला रुग्णालयात दाखल केल्याच्या क्षणापासून ते मला डिस्चार्ज मिळेपर्यंत, तो हातात आपली बॅग घेऊन तिथेच बसून राहायचा आणि तिथून दुसरीकडे कुठेही जायला नकार द्यायचा…”
नसरिननं पुढे बोलताना सांगितलं की, जेव्हा शरीबला तिच्या आजाराबद्दल पहिल्यांदा समजलं, तेव्हा तो पूर्णपणे कोलमडून गेलेला. शरीबनं सांगितलं की, “तिच्यावर आतापर्यंत पाच वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हा आजार पाच वेळा पुन्हा बळावला आहे. आता, सहाव्यांदा हा आजार पुन्हा परतला आहे. यावेळी तर तो तिच्या संपूर्ण शरीरात पसरला आहे. मात्र हे सुद्धा संकट नक्कीच टळून जाईल, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत…”

नसरीनने कर्करोगाशी सुरू असलेल्या आपल्या दीर्घकालीन लढ्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या भावनिक आणि आर्थिक परिणामांबद्दलही मनमोकळेपणानं भाष्य केलंय. ती म्हणाली की, “हा प्रवास आणि उपचारांची प्रक्रिया अत्यंत प्रदीर्घ काळ चालणारी आहे… ती मुळीच सोपी नाही. दर दीड वर्षांनी कर्करोग पुन्हा उद्भवतो आणि प्रत्येक वेळी, उपचारांसाठी मोठा खर्च येतो. वैद्यकीय खर्चाचा हा संपूर्ण बोजा आमच्यावर प्रचंड आर्थिक ताण निर्माण करतो…”
“पाच शस्त्रक्रियांनी माझा चेहराच बदलून टाकला…”
शारीब हाश्मीचं कौतुक करताना नसरीन म्हणाली की, “त्यानं माझ्या उपचारांचा संपूर्ण खर्च कोणाकडूनही एक रुपयाही उसना न घेता उचलला आहे. माझ्यासाठी ही गोष्ट अत्यंत मोलाची आहे…” नसरीन पुढे बोलताना म्हणाली की, “हे सर्व काही अगदीच सोपं होतं, असं मी अजिबात म्हणणार नाही. असे काही दिवस असतात, जेव्हा सर्व काही अत्यंत कठीण वाटतं. एक स्त्री म्हणून चेहऱ्याच्या पाच शस्त्रक्रियांतून जाणं, आपला चेहरा इतका बदलताना पाहणं आणि बोलण्यासाठीही संघर्ष करणं… यामुळे मनाला खोलवर वेदना होतात. कधीकधी मी माझे जुने फोटो पाहते आणि विचार करते, “मी पूर्वी किती सुंदर दिसायचे, आणि आता मी किती वेगळी दिसते!”
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा