वर्धा: समृद्धी महामार्गावर वर्ध्याजवळील (Samruddhi Mahamarg Accident) विरुळ भागात एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. आयशर ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर कारने पेट घेतला. या दुर्घटनेत कारमधील चालकासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर धडक देणाऱ्या आयशर ट्रकच्या चालकाचाही यात मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.(Samruddhi Mahamarg Accident)
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या ॲडमिशनचा आनंद क्षणार्धात मावळला
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेले कारमधील चौघेही वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथील रहिवासी होते. कुटुंबातील जुळ्या मुलींपैकी एका मुलीच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी (ॲडमिशन) हे कुटुंब पुण्याला गेले होते. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ॲडमिशन घेतलेली मुलगी पुण्यातच थांबली, तर आई-वडील, दुसरी मुलगी आणि चालक कारने वर्ध्याकडे परत येत होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जुळ्या बहिणींपैकी एका बहिणीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सालोड गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.(Samruddhi Mahamarg Accident)
Samruddhi Mahamarg Accident : अपघात कसा घडला?
अपघाताच्या काही वेळापूर्वी घटनास्थळाजवळ एथेनॉलचा एक टँकर उलटला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्गाची एक बाजू बंद करून एकेरी वाहतूक (Single lane traffic) सुरू केली होती. एकेरी वाहतूक सुरू असताना मागून येणाऱ्या भरधाव मालवाहू आयशर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो थेट पुढे असलेल्या कारवर जाऊन आदळला. धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर कारने क्षणात पेट घेतला. कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही आणि आतच होरपळून चौघांचा करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Samruddhi Mahamarg Accident : पोलिसांनी काय दिली माहिती?
वर्धा पोलिस अधीक्षक, सौरभकुमार अग्रवाल, यांनी माहिती देताना सांगितलं की, “काल रात्री पुलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर एक एथेनॉलचा टँकर पलटी झाला होता. तो नागपूरवरून नागपूरवरून येत होता. त्यामुळे त्या बाजूची जी रहदारी व्यवस्था आहे ती विस्कळीत झाली होती. दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूची रहदारी सोडणे सुरू होते. त्यादरम्यान एक कारला मागून आयशर ट्रकने धडक दिली, त्यामध्ये टोटल सहा लोकांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे. त्यामध्ये कारमध्ये चार सवार होते आणि ट्रकचे दोन सवार मृत्युमुखी झाले अशी माहिती आहे. सध्या ते एथेनॉलचा टँकर पलटी झाला त्याला काढण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर दोन्ही बाजूची व्यवस्था सुरळीत होईल. जे आतापर्यंत माहिती आहे ते चार जे कारमधील मृतक आहेत ते सालोडचे राहणारे आहेत आणि जे बाकी जे ट्रकचे आहेत ते इतर राज्याचे आहेत अशी माहिती मिळतेय.”
Samruddhi Mahamarg Accident : मन हेलावून टाकणारी घटना – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
वर्धा जिल्ह्यातील विरुळ गावाजवळ समृद्धी महामार्गावर झालेली भीषण दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या अपघातात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीनं मदत व बचावकार्य हाती घेतले असून, जखमींना आवश्यक ते उपचार मिळावेत तसंच बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम