Sai Tamhankar praises Prajakta Mali:जागतिक स्तरावर प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कान चित्रपट महोत्सवात वेगवेगळ्या देशांतील मान्यवर सेलिब्रिटी उपस्थिती दर्शवतात. यंदा मराठी भाषा आणि मनोरंजनसृष्टीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी काही कलाकार महोत्सवात सहभागी झाले.

कान चित्रपट महोत्सवाविषयी का सध्या खूप बोललं जातंय. तिथल्या रेड कार्पेटवर अवतरलेले हॉलिवूडचे सेलिब्रिटी चर्चेत असतातच. पण यावेळी काही मराठी कलाकारांनीही जगाचं लक्ष वेधून घेतलं. विशेषतः अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या रेड कार्पेटवरील पेहरावाची खूप चर्चा झाली. पारंपरिक पेहरावाला आधुनिक टच देत तिनं प्रयोग केला. त्याचं काहींनी कौतुक केलं, तर काहींनी टीका केली. या साऱ्याबाबत अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं तिचं मत मोकळेपणानं ‘मुंटा’कडे व्यक्त केलं आहे. प्राजक्ताचा अभिमान वाटत असल्याचं तिनं यावेळी स्पष्टपणे सांगितलं.
‘मला प्राजक्ता माळी हिचा अभिमान वाटतो. तिनं ज्या ग्रेसनं ‘कान’च्या रेड कार्पेटवर स्वतःला सादर केलं ते मला खूप आवडलं. पण काही जणांना ते खूप झोंबलं. एका अर्थी मला हे चांगलं वाटतं, कारण याचा अर्थ तिच्याकडे खूप जणांचं लक्ष होतं. खरं तर काय परिधान करावं आणि काय नाही; हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. काहीही झालं तरी, लोक बोलणारच आहेत. म्हणजे तुम्ही तिथे गेलात तरी आणि नाही गेलात तरी, चर्चा होऊ शकते. पण आपण का इतक्या तक्रारी करायच्या? त्यापेक्षा ते-ते क्षण साजरे करायला हवेत’, असं सई म्हणाली.
Rakhi Sawant : ‘मला किस करायचं त्याने आधीच ठरवलेलं’ मिका सिंगसोबतच्या वादग्रस्त प्रकरणावर राखी सावंतचा दावा
अभिनयासह स्टाइल आणि फॅशनसाठीही सईचं नेहमी कौतुक होतं. नवनवीन प्रयोग करत ती फोटोशूटही करत असते. त्यामुळे ग्लॅमरस सई कानच्या रेड कार्पेटवर कधी दिसणार, असं विचारलं असता ती म्हणाली, ‘मी कान महोत्सवाला कधी गेले, तर मला माझ्या एखाद्या चित्रपटाच्या सादरीकरणासाठी जायला आवडेल. वैविध्यपूर्ण पेहराव परिधान करत प्रयोगशील फोटोशूट करणं हा माझ्या कामाचा एक भाग आहे. मी माझ्या कामाप्रमाणे फोटोशूटचाही तितकाच आनंद घेते. काहींना ते आवडतं, तर काहींना खर्चिक वाटतं; याबद्दल प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. खऱ्या आयुष्यातही मला प्रयोग करण्याची भीती वाटत नाही. त्यामुळेच ते माझं काम, स्टायलिंग आणि फोटोशूट यामध्ये उतरत असेल आणि म्हणूनच ते अधिक उठून दिसत असेल.’
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळीच नव्हे तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, लोकप्रिय आणि प्रसिद्ध कन्टेंट क्रिएटर अंकिता प्रभूवालावलकर या कलावंतांच्या उपस्थितीनं कानच्या ग्लॅमरस रेड कार्पेटवर ‘मराठी’पण झळकलं. निवेदिता यांनी आकर्षक रंगाची भरजरी साडी, अप्रतिम दागिने परिधान केले होते. अशोक सराफ यांचं रेड कार्पेटवरील येणं हेच प्रत्येक मराठी मनासाठी अभिमानास्पद होतं. नऊवारीला आधुनिक टच देत प्राजक्ता ग्लॅमरस रूपात रेड कार्पेटवर अवतरली. तर अंकितानं महाराष्ट्राची शान असलेली पैठणी अनोख्या स्टाइलने परिधान करत लक्ष वेधून घेतलं.
